इस्रायल-अमेरिकेच्या विरोधादरम्यान मोठी घोषणा
वृत्तसंस्था/ लंडन
ब्रिटनने औपचारिक स्वरुपात पॅलेस्टाईनला एक स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिली आहे. पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी रविवारी ही घोषणा केली आहे. अमेरिका आणि इस्रायलच्या कठोर विरोधानंतरही ब्रिटनने हे पाऊल उचलले आहे. या निर्णयाचा उद्देश पॅलेस्टिनी आणि इस्रायलींसाठी शांततेची अपेक्षा कायम ठेवणे असल्याचा दावा स्टार्मर यांनी केला. यापूर्वी कॅनडा आणि ऑस्ट्रेलियाने देखील पॅलेस्टाइनला मान्यता दिली आहे.
हा निर्णय प्रतिकात्मक असला तरीही हा एक ऐतिहासिक क्षण आहे. दोन्ही समुदायांदरम्यान स्थायी तोडग्याच्या दिशेने पावले टाकण्याची वेळ आता आली आहे. ही मान्यता हमासला नव्हे तर पॅलेस्टाइनच्या जनतेला दिली जातेय. हमासचे भविष्यात शासनामध्ये कुठलेच स्थान नसेल आणि हमासला इस्रायली ओलिसांची त्वरित मुक्तता करावी लागणार असल्याचे स्टार्मर यांचे म्हणणे आहे.
पंतप्रधान कार्नी यांची घोषणा
कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी पॅलेस्टाइनला आमच्या सरकारने मान्यता दिली असल्याची घोषणा केली आहे. ही मान्यता द्विराष्ट्र तोडग्याच्या दिशेने शांतता प्रस्थापित करण्याचा मार्ग प्रशस्त करू शकते असे कार्नी यांनी म्हटले आहे.
ऑस्ट्रेलियाकडूनही मान्यता
ऑस्ट्रेलियाने औपचारिक स्वरुपात पॅलेस्टाइनला देश म्हणून मान्यता दिलीआहे. हा निर्णय गाझा युद्ध आणि वाढत्या आंतरराष्ट्रीय दबावादरम्यान घेण्यात आला आहे. संयुक्त राष्ट्रसंघ महासभेपूर्वी ऑस्ट्रेलियाची ही घोषणा पश्चिम आशियाच्या राजकारणातील मोठा बदल मानला जात आहे.
अमेरिका-इस्रायलची नाराजी
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ब्रिटन दौऱ्याच्या काही दिवसांनी ही घोषणा करण्यात आली आहे. हे पाऊल दहशतवादाला बळ पुरवेल आणि चुकीचा संदेश देईल असे ट्रम्प यांनी या निर्णयाला विरोध करत म्हटले आहे. इस्रायलच्या सरकारने देखील या निर्णयाला तीव्र विरोध केला आहे. जोपर्यंत हमास आणि पॅलेस्टाइन हे परस्परांपासून वेगळे होत नाहीत, तोवर अशाप्रकारची मान्यता निरर्थक असल्याचे इस्रायलचे म्हणणे आहे. तर ब्रिटनचा हा निर्णय केवळ एक ‘इशारा’ आहे, कारण पॅलेस्टाइन सध्या वेस्ट बँक आणि गाझामध्ये विभागला गेला असून त्याची कुठलीच आंतरराष्ट्रीय राजधानी मान्यत नसल्याचे तज्ञांचे सांगणे आहे.









