जलस्त्रोत्र मंत्री सुभाष शिरोडकर यांचे आवाहन ; पर्रा माडानी गणेश विसर्जन तळीचे उद्घाटन
प्रतिनिधी /म्हापसा
पडीक जमिनी या सरकार आपल्या ताब्यात घेणार असल्याचे सांगण्यात आले होते, अशी तरतूदही कायद्यात आहे. सरकारने या जमिनी ताब्यात घेणार असे म्हटले तरी कुणी कायद्याचे कलम त्वरित जारी करणार नाही. उत्पन्न वाढीसाठी शेतकऱयांना पडीक जमिनी कसाव्याच लागतील. पडीक जमिनी ठेवणे हा एक प्रकारे गुन्हा आहे अशी माहिती जलस्त्रोत्र मंत्री सुभाष शिरोडकर यांनी दिली.
पर्रा येथे गणपती विसर्जन तळीचे रितसर उद्घाटन केल्यावर ते बोलत होते. यावेळी विरोधी पक्ष नेते मायकल लोबो, सरपंच चंदू हरमलकर, उपसरपंच डॅनियल लोबो आदी पंच उपस्थित होते. या तळीच्या बांधकामासाठी 20 लाख रुपये खर्च आला आहे.
अलीकडेच जमिनी पडीक ठेवणे हा मोठा गुन्हा आहे. अशा जमिनी सरकार आपल्या ताब्यात घेईल. त्यामुळे सरकारवर राज्यभर आरोप प्रत्यारोप झाले होते. मुळात जमिनी पडीक ठेवून शेतकऱयांचे उत्पन्न हे कधीच दुप्पट होणार नाही. उत्पन्न वाढीसाठी शेतकऱयांना जमीन कसावीच लागेल. पडीक जमीन ठेवणे हा एकप्राकारे गुन्हा आहे असे मला वाटते. त्यामुळे त्यावेळी तशी सूचना केली होती असे म्हणत मंत्री शिरोडकर यांनी घुमजाव घेण्याचा प्रयत्न केला.
पडीक जमिनी ताब्यात घेणार नाही
आम्ही अनेकदा लहान मुलांना गप्प बस अन्यथा छडीने मारणार असे म्हणतो परंतु तसे कधीच करत नसतो. तशाच प्रकारे सरकार असे काहीच करणार नाही आहे. फक्त शेतकऱयांनी शेतीकडे पुन्हा वळावे हाच त्या मागचा चांगला हेतू होता. आम्ही जमिनी ताब्यात घेणार नाही असे स्पष्टीकरण मंत्री शिरोडकर यांनी दिले.
पर्रा गावातील कलिंगड प्रसिद्ध आहेत. त्यांचे आपण ब्रॅण्डिंग केले पाहिजे. गोव्यात इतरही पिक आहे ज्याचे ब्रॅण्डिंग करणे गरजेचे आहे. म्हापशातील चवळीची सुद्धा जाहिरात झाली पाहिजे. सध्या गोव्यात चवळी भेटत नसल्याने आयात करावी लागते. प्रत्येक गोष्टी बाहेरून आयात केल्यास गोमंतकीयांनी काय करावे? असा सवाल शिरोडकर यांनी उपस्थित केला.
शिरोडय़ात 250 शेतकरी खाजन शेती करतात
प्रत्येक मतदारसंघात शेती लागवड, कापणी आदीसाठी एक मशीन असायला पाहिजे. जेणेकरून शेती पडीक राहणार नाही. 250 शेतकरी आपल्या शिरोडा मतदारसंघात खाजन शेती करतात. प्रत्येकानी शेतात उतरून काम करायला पाहिजे तेव्हाच उत्पन्न दुप्पट होईल. यासाठी शेतकऱयांना सबसीडी मिळणार. पर्रात असलेल्या चारही तळीची दुरुस्ती केली जाईल असे मंत्री शिरोडकर म्हणाले.
नागरिकांसाठी तळीचे दुरुस्तीकरण ः लोबो
पर्रा येथील तळी पूर्वी बांधली होती. येथे आधी सोनारवाडा, लोबोवाडा, आराडी येथील गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात येते. आता येथे दुरुस्ती काम करून विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. त्याचा पर्रा वासियांनी लाभ घ्यावा असे आमदार तथा विरोधी पक्षनेते मायकल लोबो म्हणाले.
धारबांदोडा साखर कारखाना वर्षभरात सुरू
बंद असलेला धारबांदोडा साखर कारखाना वर्षभरात सुरू केला जाईल. त्यासाठी ऊसाची तसेच गवताची खूप आवश्यकता भासेल. कारखाना सुरू झाल्यावर राज्यभरातून आम्हाला गवताची आवश्यकता भासेल. ऊस लागवडीसाठी अत्याधुनिक पद्धतीचे मशीन प्रत्येक मतदारसंघात घ्या. त्याचा वापर खोदण्यासह रोप लागवडीसाठीही होत असल्याचे शिरोडकर यांनी सांगितले.









