कीट वाटपाच्या नावाखाली भ्रष्टाचार
बेळगाव : शिष्यवृत्ती, विवाहाचा निधी, वैद्यकीय सुविधा, पेन्शन, मृत्यू भरपाई आदी रखडलेल्या सुविधांसाठी मंगळवारी जिल्हा कामगार संघटनेतर्फे कामगार खात्यावर मोर्चा काढून निवेदन सादर करण्यात आले. रखडलेल्या सुविधांची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. कामगारांच्या मुलांना लग्नासाठी देण्यात येणारा निधी थांबवण्यात आला आहे. त्याबरोबर मुलांची शिष्यवृत्तीही कोरोना काळापासून रखडली आहे. त्यामुळे कामगारांच्या मुलांना अनेक आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याबाबत अनेकवेळा तक्रारी आणि निवेदने देऊन देखील कामगार कल्याण मंडळाने याकडे दुर्लक्ष केले आहे. कामगारांच्या विविध सुविधांसाठी 2 हजार अर्ज करण्यात आले होते. मात्र, त्यापैकी केवळ 200 अर्जांनाच मंजुरी देण्यात आली आहे. उर्वरित अर्ज रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे कामगार अडचणीत सापडले आहेत. रद्द केलेल्या अर्जांची पुन्हा छाननी करून सुविधा द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. वैद्यकीय कीट वितरणाच्या नावाखाली पैसे उकळण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे कामगारांना विविध सुविधांपासून दूर रहावे लागत आहे. कामगारांना वितरण करण्यात येत असलेल्या कीटच्या सुविधांमध्ये भ्रष्टाचार वाढला आहे. याची तातडीने चौकशी करून कामगारांच्या सुविधांमध्ये पारदर्शकता आणावी, अशी मागणी करण्यात आली.









