परीट समाज बांधवांनी एक संघ राहून श्री संत गाडगेबाबा यांचे विचार जनमानसात पोहोचविणे फार गरजेचे आहे. तरच खऱ्या अर्थाने गाडगे बाबांची पुण्यतिथी आपण साजरी केल्याचे सार्थक होईल, असे प्रतिपादन परीट समाजाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर यांनी संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात केले.
सिंधुदुर्ग जिल्हा परीट समाज व सावंतवाडी तालुका परीट समाज यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडी खासकीलवाडा येथील वटसावित्री सभागृहात श्री संत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी उत्सव साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या निमित्ताने सकाळी बाजारपेठेतील संत गाडगेबाबा भाजी मंडई येथे साफसफाई व स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. त्यानंतर वटसावित्री सभागृहात पुण्यतिथी उत्सव साजरा करण्यात आला.
श्री संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन श्री व सौ किरण वाडकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर परीट समाजाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर यांच्या अध्यक्षतेखाली परीट समाज बांधवांची बैठक झाली. त्यात जिल्हा व तालुका दौरा करून लवकरात लवकर कार्यकारणीची पुनर्बांधणी करण्याचे ठरविण्यात आले.यावेळी ह.भ.श्री विनायक आजगावकर यांचे सुश्राव्य कीर्तन झाले.नंतर महाप्रसाद घेण्यात आला.यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्रदीप भालेकर यांनी तर आभार जितेंद्र मोरजकर यांनी मानले.यावेळी जिल्ह्यातील बहुसंख्य समाज बांधव व भगिनी उपस्थित होते.
सावंतवाडी / प्रतिनिधी









