बीएसएफ जवानाच्या पित्याचे केंद्राला आवाहन
वृत्तसंस्था/ कोलकाता
पंजाबच्या फिरोजपूर सीमेनजीक कर्तव्य बजावत असताना चुकून सीमा ओलांडलेल्या बीएसएफ जवानाला पाकिस्तानी रेंजर्सनी ताब्यात घेतले आहे. या जवानाच्या पित्याने स्वत:च्या पुत्राच्या तत्काळ मुक्ततेसाठी केंद्र सरकारला आवाहन केले आहे.
बंगालच्या हुगळी जिह्यातील रिसडा येथे राहणारे बीएसएफमध्ये हेड कॉन्स्टेबल पी.के. साव यांना पाकिस्तानने ताब्यात घेतल्याचे वृत्त मिळाल्यापासून त्यांच्या परिवाराची झोपच उडाली आहे. जवानाचे पिता भोलानाथ साव यांनी कुठल्याही प्र्रकारे माझ्या मुलाला त्वरित भारतात परत आणले जावे असे आवाहन भारत सरकारला केले आहे. तसेच पाकिस्तानात तो कुठे आहे आणि कुठल्या स्थितीत आहे याची माहिती सरकारने परिवाराला द्यावी अशा मागणी त्यांनी केली. 40 वर्षीय जवानाची पत्नी रजनी साव यांनीही केंद्र सरकारला स्वत:च्या पतीच्या त्वरित आणि सुरक्षित वापसीचे आवाहन केले आहे.
माझ्या पतीच्या एका मित्राने बुधवारी रात्री फोन करून घटनेची माहिती दिली होती. माझ्या पतीला पाकिस्तानी रेंजर्सकडून ताब्यात घेण्यात आल्याचे त्याने सांगितले होते असे रजनी यांनी म्हटले आहे.
मंगळवारी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या घटनेनंतर रात्री पतीशी रजनी यांचे बोलणे झाले होते. तर बुधवारी सकाळी सुमारे 6 वाजता पाकिस्तानी रेंजर्सनी त्यांना ताब्यात घेतले होते. माझे पती 17 वर्षांपासून देशसेवेत आहेत. कुठल्याही प्रकारे माझ्या पतीला लवकर आणि सुरक्षित मायदेशी परत आणले जावे अशी केंद्र सरकारला विनंती करत असल्याचे रजनी यांनी म्हटले आहे. साव दांपत्याला एक 7 वर्षांचा मुलगा आहे. साव हे मागील महिन्यात सुटीनिमित्त घरी आले होते. 31 मार्च रोजीच ते परतले होते.
मुक्ततेसाठी चर्चा सुरू
बीएसएफच्या जवानाचे बंधू राजेश्वर साव यांनी मुक्ततेसाठी चर्चा सुरू असल्याचे प्रशासनाकडून कळविण्यात आल्याचे सांगितले आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार देखील प्रयत्न करत आहे. आम्हाला त्यांच्या सुरक्षित वापसीची अपेक्षा असल्याचे राजेश्वर यांनी म्हटले आहे.









