उमेदवार लक्ष्मी हेब्बाळकर यांचे प्रतिपादन : उगार-हारुगेरी येथे प्रजाध्वनी कार्यक्रम
वार्ताहर /किणये
महागाईमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. सिलिंडर व इतर जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढल्यामुळे सामान्य लोकांना याचा फटका अधिक बसू लागला आहे. त्यामुळे महागाई कमी करण्यासाठी कर्नाटक राज्यात काँग्रेसची सत्ता येणे गरजेचे आहे. यासाठी सर्वांनी काँग्रेसच्या उमेदवारांना निवडून आणणे आवश्यक आहे, असे मनोगत बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी कागवाड येथे झालेल्या प्रचारसभा व प्रजाध्वनी कार्यक्रमात व्यक्त केले. मंगळवारी कागवाड मतदार संघातील उगारमध्ये राजू कागे यांच्यावतीने प्रचारसभेचे आयोजन केले होते. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम झाला. यावेळी काँग्रेसचे कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राज्यात काँग्रेसमध्ये कार्यकर्त्यांसह अन्य नेत्यांचाही सहभाग वाढला आहे. बेळगाव ग्रामीणच्या मतदार संघातून मला पूर्णपणे पाठिंबा मिळत आहे. अन्य ठिकाणीही काँग्रेसच्या उमेदवारांनाच निवडून आणण्याचा निर्धार जनतेने केला असल्याचे दिसून येत आहे, असेही लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या.
आश्वासनपूर्ती पहिल्याच बैठकीत मोफत 200 युनिट वीज, घरातील महिलांसाठी प्रति महिना 2 हजार, तरुणांना बेरोजगारी भत्ता तसेच प्रत्येक व्यक्तीला 10 किलो तांदूळ देण्यात येतील. या चार मोठ्या घोषणा यावेळी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी दिल्या. या आश्वासनांची पूर्तता राज्यात काँग्रेस सत्तेवर आल्यास मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत पूर्ण करण्यात येतील, असेही यावेळी सांगण्यात आले. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी विविध ध्येयधोरणांची माहिती यावेळी दिली. याप्रसंगी कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळे पक्षाला बळकटी मिळाली आहे. आमदार सतीश जारकीहोळी यांच्या मार्गदर्शनाखाली बेळगाव जिल्ह्यातील काँग्रेसच्या सर्वाधिक जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी होणार असल्याचा विश्वासही मान्यवरांनी व्यक्त केला. व्यासपीठावर आमदार सतीश जारकीहोळी, विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी, कागवाड विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार राजू कागे, कुडची मतदारसंघाचे उमेदवार महेंद्र तम्मण्णावर आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.









