केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचे खानापूर येथे आवाहन : विठ्ठल हलगेकरांची प्रचार सभा
वार्ताहर / नंदगड
देशात ज्या ज्या ठिकाणी काँग्रेस व विरोधकांचे सरकार आहे. तेथे हिंदूंचा अवमान केला जात आहे. महिलांवर अत्याचार केला जात आहे. काँग्रेस विविध स्थानिक सरकारशी हात मिळवणी करीत आहे. त्यामुळे तेथे महिलांचे हाल होत असून महिला असुरक्षित आहेत. महिलांच्या सुरक्षिततेसाठी भाजपला पुन्हा सत्तेत आणा, असे आवाहन केंद्रीय बाल व महिला कल्याण खात्याच्या मंत्री स्मृती इराणी यांनी केले. त्या खानापुरात भाजपचे विठ्ठल हलगेकर यांच्या प्रचारसभेत बोलत होत्या. व्यासपीठावर बेळगाव जिल्हाध्यक्ष संजय पाटील, खानापूर भाजप अध्यक्ष संजय कुबल, माजी आमदार अरविंद पाटील, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, सुलक्षणा सावंत, प्रभारी उज्ज्वला बडवाण्णाचे, वासंती बडगेर, मंजुळा कापसे, किरण यळळूरकर, धनश्री सरदेसाई, सुरेश देसाई, सुवर्णा पाटील, जोतिबा रेमाणी, बाबुराव देसाई यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
पुढे बोलताना मंत्री स्मृती इराणी म्हणाल्या, यापूर्वी काँग्रेस सरकारने मतांसाठी केवळ विशिष्ट समाजासाठीच आरक्षण दिले होते. दलित, शोषित, आदिवासी यांना आरक्षणापासून दूर ठेवले होते. देशात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार आल्यानंतर प्रत्येक समाजासाठी दोन टक्के आरक्षण वाढवून सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. गांधी घराण्याच्या पारंपरिक अमेठी मतदारसंघात चाळीस वर्षांत कोणताही विकास झाला नव्हता. तो भाजपने केल्याची अनेक उदाहरणे त्यांनी दिली. काँग्रेस आमदार खासदार झाल्याने आमेठीला 40 वर्षे लुटले. आता खानापूरला लुटायला देऊ नका, असे आवाहन त्यांनी मतदारांना केले. भाजप सरकारने आयुष्मान भारत योजनेखाली सर्वांना आरोग्य कवच दिले आहे. अन्य समाजपयोगी योजना राबविल्या आहेत. यावेळी भाजपचे उमेदवार विठ्ठल हलगेकर यांनी खानापूर तालुक्मयाच्या सर्वांगीण विकासासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. त्यासाठी एक वेळ मला संधी द्या, अशी विनंती मतदारांना केली.
खानापुरात रोड शो
स्मृती इराणी यांचे येथील राजा छत्रपती चौकात आगमन झाल्यानंतर विठ्ठल हलगेकर यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर मुख्य रस्त्यावरून स्मृती इराणी यांचा रोड शो झाला. सभेला महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.









