मुंबईचा तुषार देशपांडे : 20 धावांत 3 बळी
वृत्तसंस्था / जयपूर
2023 च्या क्रिकेट हंगामातील सुरू झालेल्या सय्यद मुस्ताक अली चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेतील सामन्यात मुंबई आणि विदर्भ याने आपल्या प्रतिस्पर्ध्यावर शानदार विजय नोंदवले. मुंबईने अ गटातील सामन्यात बडोदा संघाचा केवळ तीन धावांनी पराभव केला. तर विदर्भ संघाने राजस्थानचा सहा गड्यांनी पराभव केला.
मुंबई आणि बडोदा या संघातील झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबईने 20 षटकात 8 बाद 142 धावा जमवल्या. यशस्वी जैस्वालने 33 चेंडूत 38, शिवम दुबेने 30 चेंडूत 35 धावा जमवल्या. बडोदातर्फे सेठने 31 धावात 3 तर रजपूतने 21-2 गडी बाद केले. त्यानंतर बडोदा संघाने 20 षटकात 8 बाद 139 धावापर्यंत मजल मारल्याने त्यांना हा सामना 3 धावांनी गमवावा लागला. मुंबई संघातील मध्यमगती गोलंदाज तुषार देशपांडेने 20 धावात 3 तर मुलानीने 27 धावात 2 गडी बाद केले. बडोदाच्या डावामध्ये कर्णधार कृणाल पांड्याने 50 चेंडूत 62 तर शिवलिक शर्माने 17 चेंडूत 30 धावा झोडपल्या.
अ गटातील दुसऱ्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने 20 षटकात 6 बाद 200 धावा जमवल्या. कुणालसिंग राठोडने नाबाद 61, दीपक हुडाने 60, दीपक चहरने नाबाद 26, अभिजित तोमरने 26 धावा जमवल्या. विदर्भतर्फे उमेश यादव आणि दर्शन नलकांडे यांनी प्रत्येकी दोन तर सरवठेने एक गडी बाद केले. त्यानंतर विदर्भने 19.5 षटकात 4 बाद 205 धावा जमवत हा सामना सहा गड्यांनी जिंकला. ध्रुव शोरेने 74, अथर्व तायडेने 54, करुण नायरने 22, जितेश शर्माने 19, शुभम दुबेने नाबाद 21 धावा केल्या. राजस्थानतर्फे दीपक चहर, राहुल चहर आणि खलिल अहमद यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला.
संक्षिप्त धावफलक : मुंबई 20 षटकात 8 बाद 142, बडोदा 20 षटकात 8 बाद 139.









