वृत्तसंस्था/ बेंगळूर
येथे सुरू असलेल्या 2023 च्या रणजी क्रिकेट स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या सामन्यात शुक्रवारी खेळाच्या तिसऱया दिवसाअखेर सौराष्ट्रने पहिल्या डावात 4 बाद 364 धावा जमवित कर्नाटकाला चोख प्रत्युत्तर दिले. तत्पूर्वी कर्नाटकाचा पहिला डाव 407 धावांवर संपुष्टात आला होता. सौराष्ट्रतर्फे शेल्डन जॅक्सन आणि कर्णधार अर्पित वासवदा यांनी शानदार शतके झळकविली.
या उपांत्यफेरीच्या सामन्यात कर्नाटकाने पहिल्या डावात 407 धावांचा डोंगर उभा केला. कर्णधार मयांक अगरवालने झळकविलेल्या द्विशतकामुळे कर्नाटकाने 400 धावांचा टप्पा ओलांडला होता. सौराष्ट्रने 2 बाद 76 या धावसंख्येवरून तिसऱया दिवसाच्या खेळाला पुढे प्रारंभ केला. पण सलामीचा हार्विक देसाई, कौशिकच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. त्याने 4 चौकारांसह 33 धावा जमविल्या. सौराष्ट्रची स्थिती यावेळी 3 बाद 92 अशी होती आणि कर्नाटकाची बाजू अधिक भक्कम वाटत होती. दरम्यान, कर्णधार अर्पित वासवदा आणि जॅक्सन यांनी शानदार फलंदाजी करताना चौथ्या गडय़ासाठी 232 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. तिसऱया दिवशीचा खेळ संपण्यापूर्वी कर्नाटकाच्या के. गौतमने जॅक्सनला पायचीत केले. त्याने 245 चेंडूत 2 षटकार आणि 23 चौकारांसह 160 धावा झळकविल्या. कर्णधार वासवदा आणि चिराग जेनी यांनी खेळाच्या शेवटच्या अर्ध्या तासाच्या कालावधीत सावध फलंदाजी करत संघाची अधिक पडझड होऊ दिली नाही. दिवसअखेर वासवदा 219 चेंडूत 15 चौकारांसह 112 धावांवर तर चिराग जेनी 2 चौकारांसह 19 धावांवर खेळत आहेत. जॅक्सन आणि वासवदा यांनी कर्नाटकाच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतला. या सामन्यातील खेळाचे अद्याप दोन दिवस बाकी आहेत. दरम्यान, सौराष्ट्रचा संघ पहिल्या डावात आघाडी मिळविण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. कर्नाटकाचा संघ अद्याप 43 धावांनी आघाडीवर आहे.
संक्षिप्त धावफलक
कर्नाटक प. डाव 133.3 षटकात सर्व बाद 407 (मयांक अगरवाल 249, एस. शरद 66, साकारिया 3-73, कुशांग पटेल 3-109), सौराष्ट्र प. डाव 112 षटकात 4 बाद 364 (शेल्डन जॅक्सन 160, अर्पित वासवदा खेळत आहे 112, देसाई 33, व्ही. जडेजा 22, जेनी खेळत आहे 19, कवीरप्पा 2-64, कौशिक 1-65, के. गौतम 1-68).









