ऑनलाईन टीम / तरुण भारत :
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणारे भाजप खासदार बृजभूषण सिंह पुण्यात आले आहेत. आज होणाऱ्या महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्याला ते हजेरी लावणार आहेत. पुण्यात आल्यावर त्यांनी राज ठाकरेंबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत आले आहे. माझं राज ठाकरेंशी वैयक्तिक वैर नाही. कधीकाळी उत्तर प्रदेशातील नागरिकांना महाराष्ट्रात त्रास झाला होता. त्यावर राज ठाकरे यांनी माफी मागावी, अशी मागणी मी केली होती. ती गोष्ट आता संपली, गेले ते दिवस, असे बृजभूषण यांनी म्हटले आहे.
“राज ठाकरे चूहा हैं”, असं म्हणत बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला कडाडून विरोध केला होता. महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या निमित्ताने बृजभूषण सिंह पुण्यात येणार असल्याने मनसे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. पण बृजभूषण सिंह यांच्या दौऱ्याला मनसेकडून कोणताही विरोध होणार नसल्याचे आगोदरच मनसेने स्पष्ट केलं होतं. दरम्यान, आज कुस्तीच्या अंतिम सामन्यासाठी बृजभूषण सिंह पुण्यात आले आहेत. पुण्यात आल्यावर त्यांनी राज ठाकरेंबद्दलची आपली भूमिका बदलल्याने त्यांचं राज ठाकरेंसोबतचं वैर संपलं का? अशा चर्चा रंगू लागल्या आहेत.
काय म्हणाले बृजभूषण सिंह?
उत्तर प्रदेशातील नागरिकांना कधीकाळी महाराष्ट्रात त्रास झाला होता. त्यावर राज ठाकरे यांनी माफी मागावी, अशी मागणी मी केली होती. राज ठाकरे यांना देखील माहित नसेल की, त्यांच्या कार्यकर्त्यांकडून आमच्या नागरिकांना त्रास झाला असेल. पण आता ती गोष्ट संपली, ते दिवसे गेले. राज ठाकरेंसोबत माझं वैयक्तिक वैर नाही. ते मंचावर आले तर मी त्यांना नक्की भेटेन.








