कुस्तीपटूंच्या आंदोलनाला वाढता पाठिंबा सुरूच
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
गेल्या आठ दिवसांपासून दिल्लीत जंतरमंतर येथे सुरू असलेल्या कुस्तीपटूंच्या आंदोलनाला वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गजांचा पाठिंबा मिळू लागला आहे. मात्र, याचदरम्यान ब्रिजभूषण शरण सिंग राजीनामा न देण्याच्या आपल्या पवित्र्यावर ठाम असल्याने तिढा वाढत चालला आहे. तसेच सरकारच्यावतीनेही आंदोलकांशी अजून थेट चर्चा न केल्याने जंतरमंतरमधील आंदोलन सुरूच आहे.
राजधानी दिल्लीत जंतरमंतरवर कुस्तीपटूंचे आंदोलन आठ दिवसानंतरही कायम आहे. एकीकडे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ब्रिजभूषण शरण सिंग यांच्याविरोधात दिल्ली पोलिसांनी तक्रार दाखल केली. तसेच आंदोलक खेळाडूंना पोलीस संरक्षणही देण्यात आले आहे. मात्र, ब्रिजभूषण शरण सिंग आपला हेका सोडत नसल्याने या आंदोलनावरून ‘राजकारण’ तीव्र होताना दिसत आहे. त्याचबरोबर यात राजकीय, प्रादेशिक वादांचीही किनार उभी करण्याचा प्रयत्न होत आहे.
आंदोलकांनी दिल्ली पोलिसांकडे लैंगिक छळाची तक्रार दाखल केली होती. पण पाच दिवस दिल्ली पोलीस त्यावर काही हालचाल करत नव्हते. अखेर सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर ही तक्रार दाखल करून घेतली. तरीही ब्रिजभूषण आपल्या पदावर अजूनही कार्यरत आहेत. आता जोपर्यंत ब्रिजभूषण राजीनामा देत नाहीत तोपर्यंत माघार नाही असा पवित्रा आंदोलकांनी पवित्रा घेतला आहे. दुसरीकडे या सगळ्या वादाला हरियाणा विऊद्ध उत्तर प्रदेश, तसेच जाट विऊद्ध ठाकूर अशा वादाचीही किनार मिळताना दिसत आहे. दोन्ही बाजूंच्या संघटनाकडून त्यानुसारच भूमिका घेतल्या जात आहेत.
ब्रिजभूषण सिंग यांचे हरियाणाकडे बोट
हरियाणात कुस्ती फेडरेशन सुरू करायला आपण परवानगी दिली नसल्यामुळे तिथल्या एका बड्या उद्योजकाने काहींना हाताशी धरून हे षड्यंत्र आखल्याचा ब्रिजभूषण सिंग यांचा दावा आहे. तसेच या सगळ्या आंदोलनापाठीमागे काँग्रेसचे हरियाणातील नेते दिपेंदर हु•ा असल्याचेहीत त्यांचे म्हणणे आहे. हरियाणातील एका उद्योगपतीनेही आपली ताकद त्यांच्या पाठीमागे लावल्याचा त्यांचा आरोप आहे.









