महिला कुस्तीपटू छळ प्रकरणात दिलासा
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
महिला कुस्तीपटूंच्या छळप्रकरणाचा आरोप असलेल्या ब्रिजभूषण शरण सिंग यांना मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायालयाकडून गुरुवारी त्यांना 25 हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्मयावर नियमित जामीन मिळाला आहे. जामीन मंजूर करताना न्यायालयाने ब्रिजभूषण यांना काही अटी-शर्थीही निर्धारित केल्या आहेत. न्यायालयाला माहिती दिल्याशिवाय देशाबाहेर जाणार नाही, साक्षीदारांवर प्रभाव टाकणार नाही, असे निर्देश न्यायालयाने त्यांना दिले आहेत. संशयित आरोपींवर कायद्यानुसार खटला चालवला जावा आणि दिलासा देण्यापूर्वी काही अटी घालण्यात याव्यात, असे सुनावणीदरम्यान दिल्ली पोलिसांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सरकारी वकिलाने न्यायालयाला सांगितले. न्यायालयाने सरकारी वकिलांना जामीन अर्जाला विरोध करत आहात का, असे विचारले असता मी विरोध करत नाही आणि समर्थनही करत नाही. कायद्यानुसार आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार अर्ज निकाली काढण्यात यावा, असे त्यांनी न्यायालयाला सांगितले. तक्रारदारांची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी आरोपी अत्यंत प्रभावशाली असल्याचे सांगत जामीन अर्जाला विरोध केला. मात्र, न्यायालयाने कडक अटी-शर्थी लादत त्यांना नियमित जामीन देण्याची तयारी दर्शवली. यावर आपल्या अशीलाकडून सर्व अटींचे पालन केले जाणार असल्याचे आरोपीच्या वकिलाने न्यायालयाला सांगितले.
पोलिसांकडून यापूर्वीच आरोपपत्र
ब्रिजभूषण शरण सिंग यांच्यावर झालेल्या आरोपांप्रकरणी पोलिसांनी 1599 पानांचे आरोपपत्र यापूर्वीच दाखल केले आहे. या आरोपपत्रात ब्रिजभूषण शरण सिंग आणि डब्ल्यूएफआय सचिव विनोद तोमर यांच्या विरोधात खटल्याचा उल्लेख आहे. या आरोपपत्रात एकूण 44 साक्षीदार आहेत. आरोपपत्रात एकूण 108 जणांचे जबाब नोंदवण्यात आले असून त्यामध्ये 15 जणांनी कुस्तीगीरांच्या समर्थनार्थ निवेदने दिली आहेत.









