महिला पैलवान प्रकरणी न्यायालयाचा निर्णय
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारतीय कुस्ती संघटनेचे माजी प्रमुख आणि भारतीय जनता पक्षाचे नेते ब्रिजभूषण शरण सिंग यांची चार वर्षांपूर्वी गाजलेल्या महिला पैलवान शोषण प्रकरणातून निर्दोष मुक्तता झाली आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी प्रकरण बंद केल्याचा अहवाल (क्लोजर रिपोर्ट) सादर केला होता. दिल्लीच्या पतियाळा हाऊस न्यायालयाने तो मान्य करून ब्रिजभूषण शरण सिंग यांची निर्दोष मुक्तता केली.
ब्रिजभूषण शरण सिंग यांच्यावर एका अल्पवयीन पैलवान युवतीचेही शोषण केल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकणात त्यांच्यावर बंद दरवाजाआड प्रकरण चालविण्यात आले. तथापि, सदर अल्पवयीन पैलवान युवती साक्ष देण्यासाठी पुढे आली नाही. तसेच पोलिसांनी सादर केलेल्या क्लोजर रिपोर्टलाही तिने विरोध केला नाही. या प्रकरणात जी चौकशी झाली ती समाधानकारक आहे. पोलिसांनी सादर केलेल्या क्लोजर रिपोर्टसंबंधीही आपण संतुष्ट आहोत, हे तिने न्यायालयात स्पष्ट केले. त्यामुळे न्यायालयाने सिंग यांची या प्रकरणातून मुक्तता केली.
काय होते प्रकरण
भारतीय जनता पक्षाचे उत्तर प्रदेशातील खासदार ब्रिजभूषण शरण सिंग हे चार वर्षांपूर्वी भारतीय ऑलिंपिक कुस्ती संघटनेचे अध्यक्ष होते. त्यांनी काही महिला पैलवानांचे शोषण केले असा आरोप करण्यात आला होता. विनेश फोगाट, साक्षी मलिक आदी प्रसिद्ध महिला पैलवानांनी हा आरोप केला होता. आपल्याला न्याय मिळावा या मागणीसाठी त्यांनी रस्त्यावर उतरुन आंदोलनही केले होते. त्यांना काही पुरुष पैलवानांचाही पाठिंबा मिळाला होता. त्यानंतर ब्रिजभूषण शरण सिंग यांनी पदत्याग केला होता. तसेच त्यांची चौकशीही करण्यात आली होती. याच काळात एका अल्पवयीन महिला पैलवानानेही त्यांच्यावर शोषणाचा आरोप केला होता. तथापि, नंतर तिने आणि तिच्या पालकांनी आरोपातून माघार घेतली होती. तथापि, सिंग यांच्यावर पोक्सो अंतर्गत प्रकरण चालवावे असा आग्रह आंदोलक पैलवानांनी धरला होता. या प्रकरणाला राजकीय रंग देण्याचाही प्रयत्न करण्यात आला. 2024 मध्ये झालेल्या हरियाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने हा मुद्दा लावून धरला होता. तसेच विनेश फोगाट हिला काँग्रेसचे तिकीटही देण्यात आले होते. ती या निवडणुकीत विजयी झाली. पण काँग्रेसचा पराभव झाला. सिंग यांच्या विरोधात अल्पवयीन महिला पैलवानासंबंधीच्या आरोपांची दिल्ली पोलिसांनी चौकशी केली. नंतर 2023 मध्ये प्रकरण बंद केल्याचा अहवाल सादर केला. या अल्पवयीन महिला पैलवानाने आणि तिच्या मातापित्यांनी हा अहवाल मान्य केल्यानंतर आता कनिष्ठ न्यायालयातून ब्रिजभूषण शरण सिंग यांची निर्दोष मुक्तता केली आहे.









