कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण प्रकरण : सचिव विनोद तोमर यांनाही समन्स
► वृत्तसंस्था/ पानिपत
भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण यांच्याशी संबंधित कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी शुक्रवारी दिल्लीतील राऊस एव्हेन्यू न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने ब्रिजभूषण शरण सिंह आणि त्यांचे सचिव विनोद तोमर यांना समन्स बजावले आहे. त्याबाबत न्यायालयाने समन्स बजावून दोघांनाही 18 जुलै रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले. यापूर्वी या प्रकरणाची सुनावणी 1 जुलै रोजी झाली होती. दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायालयाने लैंगिक छळ प्रकरणात दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घेण्याचा विचार करण्यासाठी 7 जुलैची तारीख निश्चित केली होती.
अल्पवयीन कुस्तीपटूच्या वक्तव्यावरून ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या खटल्याच्या क्लोजर रिपोर्टवरही नुकतीच दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायालयात सुनावणी झाली. या अहवालावर चर्चा केल्यानंतर न्यायालयाने अल्पवयीन कुस्तीपटू आणि त्याच्या वडिलांना निवेदन बदलण्यासंबंधीच्या मुद्द्यावर नोटीस बजावली असून निवेदन बदलण्याचे कारण विचारले आहे. न्यायालयाने 15 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितले आहे.









