वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारतीय कुस्ती संघटनेचे अध्यक्ष खासदार ब्रिजभूषण शरण सिंग यांना अजूनपर्यंत तरी क्लिनचिट देण्यात आलेली नाही, असे स्पष्टीकरण दिल्ली पोलिसांनी केले आहे. त्यांच्या विरोधात कोणाताही पुरावा सापडलेला नाही, असे वृत्त बुधवारी पसरलेले होते. मात्र, या संबंधी आमच्याकडून कोणतीही घोषणा झालेली नसून न्यायालयातच चौकशीचा अहवाल सादर केला जाईल. तोपर्यंत त्याची माहिती दिली जाणार नाही, असे प्रतिपादन पोलिसांनी केले.
ब्रिजभूषण यांच्याविरोधात एका महिला कुस्तीपटूने शारिरीक शोषण केल्याची तक्रार केली आहे. जेव्हा या कथित शारिरिक शोषणाचा प्रकार घडला, तेव्हा ही महिला कुस्तीपटू अल्पवयीन होती, असा दावा करण्यात आला होता. तथापि, पोलिसांनी केलेल्या चौकशीत ही महिला त्यावेळी सज्ञान वयाची होती, असे दिसून आले आहे. या महिलेच्या एका नातेवाईकाने दोन दिवसांपूर्वी एका पत्रकार परिषदेतही तिची तक्रार खोटी असल्याचा गौप्यस्फोट केला होता. या महिला कुस्तीपटूला इतर कुस्तीपटूंनी ब्लॅकमेल केल्याचा आरोपही त्याने केला होता.
यामुळे या महिलेने सादर केलेल्या तक्रारीविषयीच संशय निर्माण झाला आहे. तिच्या तक्रारीला बळ मिळेल, असा पुरावा तिलाही देता आलेला नाही, असे बोलले जात आहे. तिच्या जन्मप्रमाणपत्राविषयीही अनेक शंका आहेत. तिची दोन जन्मप्रमाणपत्रे असल्याचे दिसून आले आहे. तसेच तिच्या नावाने असलेले एक मृत्यूप्रमाणपत्रही असल्याची चर्चा आहे. त्यामुळे एकंदर प्रकरण संशयाच्या घेऱ्यात सापडले आहे. आता चौकशीतच यातील सत्य उघडकीस येणार आहे.
ब्रिजभूषण शरण सिंग यांनी त्यांच्यावरील आरोप नाकारले आहेत. तसेच दोन्ही बाजूंकडून एकमेकांना नार्को अॅनालिसिस चाचणीचे आव्हान देण्यात आले आहे. सध्या या प्रकरणी कोणती सविस्तर माहिती पत्रकारांना न देण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयातच अहवाल सादर करण्यात येणार आहे. कोणीही या प्रकरणाचा राजकीय गैरवापर करण्याचा प्रयत्न करु नये, असेही आवाहन क्रिडा क्षेत्रातील मान्यवरांनी केले आहे.
राजकीय हस्तक्षेप
कुस्तीपटूंच्या आंदोलनात आता राजकारणही शिरले असल्याचा आरोप केला जात आहे. अनेक विरोधी पक्षांनी कुस्तीपटूंच्या आंदोलनाला पाठिंबा दिला असून ब्रिजभूषण सिंग यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. त्याचवेळी दिल्ली पोलिसांनी त्यांची चौकशी चालविली आहे. अद्याप या प्रकरणावर केंद्र सरकारने कोणतेही अधिकृत भाष्य केलेले नाही.
लवकरच पूर्ण होणार
या प्रकरणी लवकरच चौकशी पूर्ण केली जाईल आणि त्यानंतरच त्याचा उलगडा होईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले. तोपर्यंत कोणीही अफवा पसरवून वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न करु नये, असे आवाहनही करण्यात आले.









