ऑनलाईन टीम / तरुण भारत :
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी प्रकृतीच्या कारणास्तव 5 जूनचा अयोध्या दौरा तूर्तास स्थगित केला आहे. त्यावरुन उत्तर प्रदेशमधील भाजपाचे खासदार बृजभूषण सिंह (brijbhushan singh) यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. राज ठाकरे फार दुर्दैवी आहेत. दुर्दैव त्यांचा पाठलाग सोडत नाही. माफी मागण्याची त्यांच्याकडे एक संधी होती. पण ते या संधीला मुकले. माफी मागून त्यांचा राग शांत झाला असता. आता माफी न मागून राज ठाकरे यांनी जुन्या जखमा ताज्या केल्या. त्यामुळे मी ठरवलंय की मी माझा कोणताही कार्यक्रम स्थगित करणार नाही, असे बृजभूषण सिंह यांनी म्हटले आहे.
बृजभूषण सिंह म्हणाले, आम्ही पाच जून रोजी अयोध्येमध्ये शरयू नदीत स्नान करणार आहोत. तेथील साधू-संतांसोबत आम्ही पूजा-पाठही करणार आहोत. राज ठाकरेंनी त्यांचा दौरा स्थगित केला असला तरी आम्ही तिथे नक्की जाणार आहोत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा वाढदिवसही पाच जूनला आहे. आम्ही योगी आदित्यनाथांचा वाढदिवसही तिथे साजरा करणार आहोत. राज ठाकरेंना अयोध्या दौऱ्याच्या निमित्ताने उत्तर भारतीयांची माफी मागण्याची संधी होती. पण ते दुर्देवी असल्याने या संधीला मुकले. माफी मागून त्यांचा राग शांत झाला असता पण त्यांनी माफी न मागून जुन्या जखमा ताज्या केल्या. त्यामुळे आम्ही आमचा कोणताही कार्यक्रम रद्द करणार नाही.
दरम्यान, राज ठाकरेंचा अयोध्या दौरा जाहीर झाल्यापासून बृजभूषण सिंह यांनी या दौऱ्याला विरोध केला होता. उत्तर भारतीयांची हात जोडून माफी मागितल्याशिवाय अयोध्येत पाऊल ठेवू देणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला होता. मात्र आता प्रकृतीच्या कारणामुळे तुर्तास राज ठाकरे यांचा हा दौरा रद्द करण्यात आला आहे. याबाबत रविवारी पुण्यात होणाऱ्या सभेत राज ठाकरे आपली पुढची भूमिका मांडतील.








