‘ब्रिक्स’ संमेलनात हस्तांदोलन : अन्य देशांच्या प्रतिनिधींशीही संवाद
वृत्तसंस्था /जोहान्सबर्ग
दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे 15 व्या ब्रिक्स शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची संक्षिप्त चर्चा झाली. त्यांनी एकमेकांना हस्तांदोलन करून अभिवादन केले. एएनआय या वृत्तसंस्थेने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये पंतप्रधान मोदी ब्रिक्स नेत्यांच्या ब्रीफिंगला जात असताना चीनच्या राष्ट्रपतींशी बोलताना दिसले. यापूर्वी बुधवारी पंतप्रधान मोदी आणि जिनपिंग यांनी पूर्ण सत्राला हजेरी लावली, परंतु छायाचित्र सत्रादरम्यान ते वेगळे उभे राहिल्याचे दिसून आले होते. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे सहभागी झालेल्या अन्य काही देशांच्या प्रतिनिधींशी द्विपक्षीय चर्चा केली. पंतप्रधान मोदी यांनी यापूर्वी गेल्या नोव्हेंबरमध्ये चिनी राष्ट्रपतींशी बाली येथील जी-20 नेत्यांच्या औपचारिक डिनरदरम्यान हस्तांदोलन करत थोडक्मयात चर्चा केली होती. 2020 मधील लडाखमध्ये दोन देशांच्या सैन्यामध्ये झालेल्या झटापटीनंतर दोन प्रमुख नेत्यांमधील ही पहिली सार्वजनिक भेट होती. जून 2020 मध्ये गलवान खोऱ्यात दोन्ही सैन्यांमध्ये झालेल्या चकमकीनंतर भारत आणि चीनमधील संबंध ताणले गेले आहेत. परिस्थिती सोडवण्यासाठी दोन्ही देशांमध्ये लष्करी पातळीवरील चर्चेच्या 19 फेऱ्या झाल्या. मात्र, या चर्चेतून यशस्वी तोडगा निघू शकलेला नाही.









