सातारा :
सातारा शहराला ऐतिहासिक महत्व आहे. शहरात आजही काही वास्तू या मोठ्या दिमाखाने इतिहासाची साक्ष देत आहेत. अशाच राजधानी साताऱ्यात महानुभव मठ ते करंजे नाका या दरम्यान ओढ्याच्या पुलावर तुटलेला दगडी शिलालेख आढळून आला. त्या शिलालेखाचे सवंर्धन करण्यासाठी तो शिलालेख छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात आणण्यात आला आहे, अशी माहिती अभिरक्षक प्रवीण शिंदे यांनी दिली.
सातारा येथील महानुभव मठ ते करंजे नाक्याच्यामध्ये ओढ्याच्या पुलावर असलेला तुटलेला दगडी शिलालेख असल्याचे शिलालेख अभ्यासक अनिल दुधाणे यांनी सांगितल्यानंतर श्री छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाचे अभिरक्षक प्रवीण शिंदे यांनी स्वतः जाऊन त्याची पाहणी केली. तो शिलालेख पुढे खराब होऊन नष्ट होऊ नये म्हणून त्याचे जतन व संरक्षण करण्याकरता संग्रहालयात आणून ठेवण्यात आलेला आहे. या शिलालेखाचे शिलालेख अभ्यासक अनिल दुधाने यांनी प्रथम वाचन केले आहे. शिलालेख इसवी सन १८४९ मधील असून छत्रपती शहाजीराजे उर्फ अप्पासाहेब महाराजांच्या कारकीर्दतील आहे.
यावेळी शिलालेख काढताना सुभाषआबा गायकवाड, रोहन ढाणे तसेच संग्रहालय कर्मचारी यांनी सहकार्य केले. या शिलालेखाचे जतन व संवर्धन करून सातारा इतिहास गॅलरीमध्ये पाहण्याकरीता ठेवण्यात येणार असल्याचे संग्रहालयाचे अभिरक्षक प्रविण शिंदे यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी आवाहन केले की, सातारा परिसरात काही शिलालेख, शिल्प इत्तरस्त्र पडलेली असल्यास संग्रहालयाशी संपर्क साधावा, असे त्यांनी सांगितले.








