बेळगाव-गोवा व्हाया रामनगर रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत
खानापूर : खानापूर-रामनगर रस्त्यावरील लेंढ्यानजीक मोहीशेत गावाजवळ सुरू असलेल्या पुलाच्या कामाचा भराव खचल्याने या रस्त्यावरील वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली असून खानापूर-गोवा रस्त्यावर वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे, अशी माहिती खानापूर-रामनगर रस्त्याचे व्यवस्थापक श्रवण हराळे यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना दिली. खानापूर-रामनगर ते गोवा हद्दीपर्यंत नव्याने रस्त्याचे बांधकाम सुरू असून लोंढ्यानजीक मोहीशेतजवळ पुलाचे काम सुरू होते. मात्र गेल्या चार दिवसांपासून तालुक्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे आलेल्या पाण्याच्या प्रवाहामुळे सुरू असलेले बांधकाम खचले. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली आहे. खानापूर ते गोवा हद्दीपर्यंतच्या रस्त्याचे काम एम. व्ही. म्हात्रे या कंत्राटदाराने घेतले आहे. पुढीलवर्षी मे महिन्यापर्यंत या रस्त्याचे काम पूर्ण होणार आहे. यासाठी या मार्गावरील पुलाचे काम हाती घेण्यात आले आहे. मोहीशेत नाल्यावरील पुलाचे काम सुरू होते. मात्र जोरदार पावसामुळें पुलाच्या दोन्ही बाजूचे भराव खचून पुलाचे बांधकाम कोसळले आहे. त्यामुळे यावरील रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा झाला होता. कंत्राटदारांचे व्यवस्थापक हराळे यांनी तातडीने पर्यायी मार्ग तयार करून वाहतूक सुरळीत केली आहे. त्यामुळे बेळगाव-गोवा रस्त्यावरील पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू केली आहे.









