भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांचे प्रतिपादन
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
जागतिक व्यापार व्यवस्थेसमोरील दबाव आणि आव्हानांना तोंड देण्यासाठी ब्रिक्स देशांनी तयार असले पाहिजे, असे प्रतिपादन भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी केले आहे. वाढत्या संरक्षणवाद, उच्च आणि निम्न शुल्क आणि नॉन-टॅरिफ अडथळ्यांचा व्यापारावर परिणाम होत आहे. त्यामुळे ब्रिक्सने बहुपक्षीय व्यापार व्यवस्थेचे संरक्षण केले पाहिजे, अशी अपेक्षाही ब्रिक्स परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीत जयशंकर यांनी व्यक्त केली. तथापि, जयशंकर यांनी त्यांच्या निवेदनात अमेरिकेचा थेट उल्लेख केला नाही.
ब्रिक्सच्या मंत्रिस्तरीय बैठकीत संयुक्त राष्ट्रांच्या सुधारणांवरही चर्चा झाली. व्यापार व्यवस्थेच्या पलीकडे, ब्रिक्सने संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत व्यापक सुधारणांसाठी जोरदार प्रयत्न केले पाहिजेत. अशांत वातावरणात ब्रिक्सने शांतता राखणे, संवाद, राजनयिकता आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचे पालन करण्याचा संदेश मजबूत केला पाहिजे, असेही जयशंकर यांनी सांगितले.
बैठकीला उपस्थित असलेल्या इथिओपियाच्या परराष्ट्र राज्यमंत्री हदेरा अबेरा अदमासू यांनीही संयुक्त कृतीचा प्रस्ताव मांडला. शांतता प्रस्थापित करण्यात, जागतिक संस्थांमध्ये सुधारणा करण्यात आणि विकसनशील देशांसाठी न्याय्य आणि सुरक्षित वातावरण निर्माण करण्यात ब्रिक्सने महत्त्वाची भूमिका बजावली पाहिजे, असे त्या म्हणाल्या. याप्रसंगी बहुपक्षीय प्रणाली दबावाखाली असते तेव्हा ब्रिक्सने नेहमीच विवेकपूर्ण आणि सकारात्मक बदलाचा पुरस्कार केल्याचे जयशंकर यांनी नमूद केले.
भारतीय परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर ‘आयबीएसए’च्या म्हणजेच भारत, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका या देशांच्या मंत्र्यांच्या बैठकीतही सहभागी झाले होते. या बैठकीतही त्यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सुधारणांच्या गरजेवर भर दिला. या चर्चेत ‘आयबीएसए’चा शैक्षणिक मंच, सागरी सराव, विश्वस्त निधी आणि परस्पर व्यापार असे मुद्दे हाताळण्यात आले. भारताचे प्राधान्य अन्न आणि ऊर्जा सुरक्षा, हवामान बदल आणि शाश्वत विकास हे असल्याचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी सांगितले. तसेच त्यांनी डिजिटल परिवर्तन, स्टार्टअप्स, नवोन्मेष आणि मजबूत विकास भागीदारीवर भर दिला.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वी ब्रिक्स देशांवर अतिरिक्त शुल्क लादण्याची धमकी दिली होती. याव्यतिरिक्त त्यांनी इतर कारणांसाठी भारत आणि ब्राझीलवर एकूण 50 टक्के आणि दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या बहुतेक आयातीवर 30 टक्के शुल्क लादले आहे. ट्रम्प यांनी ब्रिक्सवर नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळेच ब्रिक्स देशांनी एकजूट दाखवण्यावर या परिषदेत विचारमंथन करण्यात आले..









