खानापूर : खानापूर तालुक्यात वीट उत्पादनाच्या कामाला जोरदारपणे सुरूवात झाली आहे. यावर्षी वीट उत्पादक वेगवेगळ्या कारणामुळे आधीच अडचणीत आहेत. त्यामुळे वीट उत्पादनाच्या कामाला उशीरा सुरूवात झाली. गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यात ढगाळ हवामान निर्माण झाल्याने वीट उत्पादकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तालुक्यात सर्वत्रच वीट उत्पादकांनी वीट उत्पादनाला मोठ्या प्रमाणात सुरूवात केली असून कच्च्या विटा मोठ्या प्रमाणात तयार करण्यात आल्या आहेत. ढगाळ वातावरणामुळे वीट उत्पादकांचे धाबे दणाणले आहेत.
खानापूर तालुक्यात वीट उत्पादनाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. पूर्वी तालुक्यातच जळाऊ लाकूड तसेच मातीसह इतर कच्चा मालदेखील मोठ्या प्रमाणात सहज उपलब्ध होता. यामुळे विटा तयार करण्यासाठी उत्पादन खर्चही कमीच होता. गेल्या काही वर्षात वीट उत्पादनाच्या खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. वीट उत्पादनासाठी लागणारे जळाऊ लाकूड महाराष्ट्र किंवा कारवार भागातून आणावे लागते. त्याचे दरही भडकले आहेत. तसेच यावर्षी वाळू उपशावर कडक निर्बंध आल्याने वीट उत्पादनासाठी लागणारा भुस्सावाळू मिळणे दुरापास्त झाले आहे. भुस्सावाळूचे दर अव्वाच्यासव्वा झाल्याने त्याचा भुर्दंडही वीट उत्पादकाना सोसावा लागला आहे. यावर्षी पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्याने तसेच पावसाळा लांबल्याने वीट उत्पादनही उशीरा सुरु झाले आहे. ढगाळ वातावरणामुळे पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे वीट व्यवसायिकांनी खबरदारी घेण्यास सुरवात केली आहे.
ढगाळ वातावरणाचा परिणाम वीट उत्पादनावर होण्याची शक्यता आहे. याची झळ वीट कामगारांना सोसावी लागणार आहे. जर असे ढगाळ वातावरण राहिल्यास वीट कामगारांकडून वीट उत्पादनावर मर्यादा येतात. त्यामुळे त्यांच्या रोजंनदारीवर परिणाम होतो. त्यामुळे त्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागते. वीट उत्पादन फक्त चार महिने चालते. या काळात निसर्गाकडून साथ मिळणे गरजेचे असते. जर पाऊस झालाच तर वीट व्यावसायिकावर तसेच वीट कामगारांनाही मोठा आर्थिक फटका सहन करावा लागतो.
वीटभट्टी लावण्याचे काम सुरू
गेल्यावर्षीपासून वीट मागणी एकदम घटल्याने तालुक्यातील वीट व्यावसायिक अडचणीत आले आहेत. मागीलवर्षीच्या विटा मोठ्या प्रमाणात शिल्लक राहिलेल्या आहेत. अशाही परिस्थितीत वीट व्यावसायिकांनीही यावर्षीही मोठ्या प्रमाणात वीट उत्पादन करण्यास सुरवात केली आहे. सध्या कच्च्या विटा मोठ्या प्रमाणात तयार झालेल्या असून आता वीटभट्टी लावण्याचे काम सुरु करण्याच्या लगबगीत वीट व्यवसायिक आहेत. अशा परिस्थितीत गेल्या दोन दिवसांपासून हवेत प्रचंड उष्णता निर्माण झाला असून ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने वीट व्यवसायिकात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. जर मोठ्या प्रमाणात वळिवाचा पाऊस झाल्यास वीट व्यावसायिकाना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे. पुढील पंधरा दिवस तरी पाऊस होऊ नये, अशी अपेक्षा वीट उत्पादकांकडून व्यक्त होत आहे.









