चार झोपड्या, धान्य, मोबाईल, रक्कम खाक
खानापूर : तालुक्यातील इदलहोंड येथील वीटभट्टी कामगारांच्या झोपड्याना आग लागून चार झोपड्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने लाखो रु. चे नुकसान झाले आहे. यात संसारपयोगी साहित्य, मोबाईल व रोख रक्कम जळून खाक झाली आहे. यामुळे वीटभट्टी कामगारांवर संकट कोसळले आहे. य् ााबाबत माहिती अशी की, खानापूर तालुक्यात सर्वत्र वीट व्यवसाय जोरदार सुरू आहे. इदलहोंड परिसरातील संजय चांगाप्पा जाधव यांच्या शेतात वीट तयार करण्यासाठी कामगारानी झोपड्या घातल्या होत्या. शुक्रवारी सकाळी हे सर्व कामगार वीट तयार करण्यासाठी कामावर गेले असता अचानक एका झोपडीने पेट घेतला. त्यामुळे बाजूला लागून असलेल्या आणखी तीन झोपड्याना आगीची झळ पोचली. त्या झोपड्यानीही पेट घेतला. वीटभट्टी कामगार व शेतकरी यांना आग विझविण्यासाठी पंप सुरू करून प्रयत्न केले. मात्र त्याचा उपयोग झाला नाही. चारही झोपड्या भस्मसात झाला. शेतकऱ्यांनी व वीटभट्टी कामगारानी प्रसंगावधानता दाखवल्यामुळे इतर झोपड्यांचा आगीपासून बचाव करण्यात आला.
कामगारात हळहळ
कामगार वंटमुरी येथील असून दरवर्षी इदलहोंड परिसरात वीटभट्टी कामासाठी येतात. या झोपड्यामध्ये संसारपयोगी साहित्य, धान्य, आठ मोबाईल संच तसेच आपल्या पगाराचे पैसे त्यांनी या झोपडीत ठेवले होते. ही रोख रक्कमही या आगीत खाक झाल्याने या वीटभट्टी कामगारांचे आर्थिक नुकसान झाले आहे. यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.









