सोमवारी होणार वीट उत्पादकांची व्यापक बैठक, पुढील दिशा ठरविण्यात येणार
वार्ताहर /नंदगड
महाराष्ट्रातून कर्नाटक राज्यात येणाऱ्या खडकांच्या चिरा दगडांवर बंदी घालावी, अशी मागणी खानापूर व बेळगाव तालुक्यातील वीट उत्पादकांतून करण्यात येत आहे. चिऱ्याचे दगड खानापूर, बेळगाव, जोयडा, अळणावर, हल्याळ, बैलहोंगल भागात येत असल्याने वीट विक्रीवर मोठा परिणाम झाला आहे. आगामी काळात वीट व्यवसाय धोक्यात येणार आहे. त्यासाठी आता संघटित लढा उभारण्यात येणार असून सोमवार दि. 1 जुलै 2024 रोजी 12 वाजता खानापूर येथील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विश्रामधामात बेळगाव व खानापूर तालुक्यातील वीट व्यावसायिकांची व्यापक बैठक बोलावण्यात आली आहे. चिऱ्याच्या बंदीसंदर्भात गत सोमवार दि. 24 रोजी खानापुरात काही मोजक्या वीट उत्पादकांत साधकबाधक चर्चा झाली. त्यावेळी भव्य प्रमाणात बैठक बोलावण्याचा निर्णय घेण्यात आला.
खानापूर व बेळगाव तालुक्यातील गर्लगुंजी, निडगल, सन्नहोसूर, भंडरगाळी, तोपिनकट्टी, बिदरभावी, बरगाव, कुप्पटगिरी देवलत्ती, गणेबैल, निट्टूर, काटगाळी, सिंगीनकोप, प्रभूनगर, झाडअंकले, माळअंकले, खेमेवाडी, मुडेवाडी, फुलेवाडी, हत्तरगुंजी, हेब्बाळ, कौंदल, कारलगा, शिवोली, हडलगा, नंदगड, भांबार्डा, हलशी, कक्केरी, होनकल, सावरगाळी, माडीगुंजी, नायकोल,गुंडपी व बेळगाव तालुक्यातील देसूर व इतर लहान मोठ्या गावांमधून घरांच्या बांधकामासाठी लागणाऱ्या जळाऊ विटा तयार करण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणात करण्यात येतो. हा व्यवसाय मनुष्यबळावर अवलंबून असून त्यासाठी लागणारे कामगार खानापूर, बेळगाव, हुक्केरी, जोयडा, हल्याळ, गोकाक व वेगवेगळ्dया भागातून मोठ्या संख्येने खानापूर, बेळगाव परिसरात येत असतात. शिवाय येथील ट्रॅक्टर, टेम्पो व ट्रक या वाहनांना विटांची वाहतूक करण्यासाठी काम मिळते. तब्बल चार महिने 15 हजाराहून अधिक लोक या व्यवसायात व्यस्त असतात. वीट व्यवसाय करणारे बहुसंख्य लोक हे शेती करणारे आहेत. जोडधंदा म्हणून अनेकजण हा व्यवसाय करतात.
अनेक वीट व्यावसायिकांचे बंकांमध्ये कर्ज
वीट व्यवसाय करण्यासाठी या व्यवसायात गुंतलेल्या अनेकांनी सहकारी पतसंस्था, बँका यांच्याकडून कर्जे घेतली आहेत. वीट व्यवसायावर परिणाम झाला तर कर्ज भरणेसुद्धा मुश्किल होणार आहे. त्यासाठी महाराष्ट्रातून येणाऱ्या चिऱ्याच्या दगडावर बंदी घालावी, हीच मागणी येथील वीट व्यावसायिकांची असून यासाठीच सोमवारी व्यापक बैठक बोलाविली आहे. बैठकीत सर्वांच्या मते जो निर्णय घेऊन संबंधित लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांना निवेदन देण्याचा विचार करणार असल्याचे वीट उत्पादकांनी सांगितले.
वीट व्यवसायावर मोठे संकट येण्याची भीती
गेल्या 40 वर्षापासून वीट व्यवसाय उत्तमरीत्या चालत आहे. या व्यवसायांमुळेच अनेकजण आपल्या वर्षभराची गुजराण करतात. मुलांचे शिक्षण, मुलांमुलींची लग्ने करण्यासाठी या व्यवसायाचा मोठा आधार आहे. असे असताना गेल्या सहा महिन्यांपासून महाराष्ट्र राज्यामधील सिंधुदुर्ग जिह्यातून बांधकामासाठी लागणारे खडकाचे चिरे मोठ्याप्रमाणात बेळगाव, खानापूर, हल्याळ, अळणावर, बैलहोंगल भागात येत आहे. अनेक लोक चिऱ्याचे दगड खरेदी करत आहेत. त्यामुळे विटांना येथील म्हणावी तशी मागणी नाही. असेच चालत राहिल्यास भविष्यात वीट व्यवसायावर मोठे संकट निर्माण होणार आहे. परिणामी या व्यवसायावर अवलंबून राहणाऱ्यांवर संकट येणार आहे. रोजगारही नष्ट होणार आहे.









