वार्ताहर/किणये
तालुक्याच्या देसूर, नंदिहळळी, राजहंसगड भागात वीट व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. या भागातील वीटही उत्तम दर्जाची असल्यामुळे इथल्या विटेला चांगली मागणी आहे. या भागातील लोकांचा हा प्रमुख व्यवसाय बनलेला आहे. यंदा मात्र ढगाळ वातावरण व अवकाळी पावसामुळे वीट व्यवसाय धोक्यात आला आहे. व्यावसायिकांनी वीट तयार करण्यासाठी कच्चा माल आणला आहे. कच्च्या विटा तयार करण्यासाठी कंत्राटही दिले आहे. कच्च्या विटा तयार करून ठेवलेल्या आहेत. या विटांच्या भट्टीचे काम जोमाने सुरू आहे. मात्र ढगाळ वातावरण व अवकाळी पावसामुळे भट्टीचे कामकाज सध्या ठप्प झाले असल्याची माहिती व्यावसायिकांनी दिली आहे.
पावसामुळे विटा खराब
वीट तयार करण्यासाठी पिवळ्या रंगाची माती विकत घेतली आहे. भट्टीसाठी लागणारे लाकूड, भाताचा भुसा आदी आणून ठेवले आहे. काही व्यावसायिकांनी वीटभट्ट्या लावल्या. तर उशिरा वीट भट्टी लावण्याचे नियोजन केलेल्यांना मात्र फटका बसला आहे. कारण कच्च्या बनवून ठेवलेल्या विटा पावसामुळे खराब झाल्या आहेत.









