पुणे / वार्ताहर :
पुण्याचे अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. अनिल रामोड यांनी भूसंपादनातील मोबदला प्रकरणात आणखी काही जणांकडून लाच घेतल्याचा संशय केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) व्यक्त केला आहे. लाचखोरीच्या प्रकरणात रामोड यांची सखोल चौकशी करण्यात येत असून त्यांचे निवासस्थान, तसेच कार्यालयातून 6 कोटी 64 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. सीबीआय न्यायालयाचे विशेष न्यायाधीश ए. एस वाघमारे यांनी रामोड यांना 13 जूनपर्यंत सीबीआय कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
अनिल रामोड यांना 8 लाख रुपयांची लाच घेताना केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (सीबीआय एसीबी) पथकाने शुक्रवारी (9 जून) पकडले. डॉ. रामोड यांच्या बाणेर येथील बंगल्यातून सीबीआयच्या पथकाने कागदपत्रे तसेच 6 कोटी 64 लाख रुपयांची रोकड जप्त केली. महामार्गावरील भूसंपादनाचा मोबदला शेतकऱ्यांना देण्यासाठी रामोड यांनी लाच मागितल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत एका वकीलाने सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली होती. तक्रारीची शहानिशा करुन सीबीआयच्या पथकाने रामोड यांच्यावर कारवाई करुन त्यांना पकडले.
रामोड यांनी शनिवारी सीबीआयच्या पथकाने विशेष न्यायालयात हजर केले. सीबीआयचे अतिरिक्त अधीक्षक आय. बी. पेंढारी यांनी रामोड यांच्या निवासस्थानातून 6 कोटी 64 लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. त्यांच्या निवासस्थानातून एक महागडा मोबाइल संच जप्त करण्यात आला आहे. रामोड यांच्या निवासस्थानातून मोठी रोकड जप्त करण्यात आली आहे. त्यामुळे रामोड यांनी आणखी काही जणांकडून लाच घेतल्याचा संशय सीबीआयने व्यक्त केला आहे. रामोड लाचखोर असल्याचे सीबीआयने विशेष न्यायालयात दाखल केलेल्या अहवालात म्हटले आहे.
100 कोटीचा जमीन व्यवहार
केंद्र सरकारने 2016 साली आळंदी पंढरपूर महामार्ग प्रस्तावित केला होता. या महामार्गासाठी भूसंपादन करण्यासाठी तक्रारदार शेतकरी यांची जमीन जाणार होती त्या बदल्यात सरकारने देऊ केलेल्या मोबदल्यापेक्षा अधिक रक्कम मिळावी यासाठी संबंधित शेतकऱ्याने अधिक रक्कम मिळावी याकरीता त्यांनी लवादकडे दाद मागितली होती. त्यांना 80 कोटी रुपये मोबदला जमिनीचा मिळणार होता त्याबदल्यात त्यांनी 100 कोटी रुपये मिळवण्याची मागणी केली होती. त्याचा गैरफायदा घेत डॉ. रामोडनी संबंधित प्रकरणाची लावदामार्फत सुनावणी जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवली पण 21 एप्रिल 2023 रोजी प्रकरण सुनावणीस घेण्यात आले. तक्रारदार यांना अधिकचा सव्वा कोटी रुपयांचा मोबदला देण्याचे निश्चित केले. मात्र, यापैकी दहा टक्के रक्कम म्हणजेच दहा लाख रुपये द्यावे लागतील असे सांगण्यात आले होते.
आरोपीचे संभाषण रेकॉर्ड
तक्रारदार आणि आरोपी यांच्यात लाच घेताना सर्व संभाषण मायक्रो फोनमध्ये रेकॉर्ड करण्यात आले आहे असे सीबीआयने न्यायाल्यात सांगितले. आरोपीच्या आवाजाचे नमुने घ्यावयाचे असल्याचे सीबीआयने स्पष्ट केले आहे. डॉ. रामोड यांच्या कार्यालयात एक लाख 26 हजार रुपये रोकड तसेच एक सीलबंद आयफोन मिळून आला असून तो जप्त करण्यात आलेला आहे.