निपाणीत लोकायुक्तांची धडक कारवाई
निपाणी : निपाणी तहसील कार्यालयात बुधवारी सर्वकाही अलबेल होते. अधिकारी आपल्या कामात गर्क होते. नागरिक आपल्या कामासाठी धावपळीत होते. याचवेळी म्हणजे सकाळी 11.30 च्या सुमारास लोकायुक्त पथकाने कोणालाही सुगावा लागू न देता कारवाई केली. या कारवाईत लाच घेताना दोन अधिकाऱ्यांचे हात रंगले. या कारवाईत तहसील कार्यालयातील भूमी विभागाचे अधिकारी तथा उपतहसीलदार अभिषेक बोंगाळे व ऑपरेटर पारिश सत्ती यांना जेरबंद करण्याची कारवाई करण्यात आली. याबाबत अधिक माहिती अशी की, अॅड. राजकुमार तुकाराम शिंदे (रा. गळतगा) यांनी आपल्या अशिल रत्नव्वा गिराप्पा गुग्गे यांच्याकडे पाच हजाराची लाच मागितली जात आहे, यासंबंधीची तक्रार लोकायुक्तांकडे 18 जुलै रोजी केली होती. लागलीच दुसऱ्या दिवशी शेती उताऱ्याच्या कामासाठी अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले. लोकायुक्त कारवाईमुळे वरकमाई आणि एजंटगिरी फोफावलेल्या शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या पायाखालची वाळूच घसरली आहे. अॅड. राजकुमार शिंदे यांनी संबंधित कामासाठी गेल्या महिन्याभरापासून आपल्या अशिलाला कार्यालयाचे फेरे मारायला लावले गेले. त्यानंतर पाच हजार द्या काम होईल, असेही सांगण्यात आले होते, असे लोकायुक्तांकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. लोकायुक्त विभागाचे जिल्हा पोलीसप्रमुख हणमंतराय यांच्या मार्गदर्शनाखाली इन्स्पेक्टर अजिज कलादगी यांच्या नेतृत्वात पथकाने कारवाई केली.









