बिलावल भुट्टो यांच्यासमक्ष जयशंकर यांनी चीनला फटकारले
वृत्तसंस्था / बीजिंग
शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या (एससीओ) एका बैठकीत भारताचे विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी चीनला चांगलेच सुनावले आहे. ही बैठक चीनकडून आयोजित करण्यात आली होती. चीनचे पंतप्रधान ली केकियांग उपस्थित असलेल्या बैठकीत बोलताना जयशंकर यांनी चीन-पाकिस्तान इकोनॉमिक कॉरिडॉरचा मुद्दा उपस्थित करत चीनला लक्ष्य केले आहे. चीनच्या कनेक्टिव्हिटी प्रोजेक्ट्सनी भारत तसेच अन्य देशांच्या सार्वभौमत्वाचा आदर केला पाहिजे, असे जयशंकर यांनी म्हटले आहे. चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प बेल्ट अँड रोड एनिशिएटिव्हची (बीआरआय) पाकव्याप्त काश्मीरमधील अंमलबजावणी मंजूर नसल्याचे जयशंकर यांनी अप्रत्यक्ष स्वरुपात स्पष्ट केले आहे.
या बैठकीत पाकिस्तानचे विदेशमंत्री बिलावल भुट्टो देखील सामील झाले होते. सीपीईसी अंतर्गत होणाऱया बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हला (बीआरआय) भारताचा विरोध आहे. बीआरआय हा पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधून जात असल्याने भारताने याला ठाम विरोध दर्शविला आहे. सीपीईसी अन् बीआरआय दोन्ही प्रकल्प भारताच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन करणारे आहेत. एससीओत सामील कजाकस्तान, किर्गिस्तान, पाकिस्तान, रशिया, तजाकिस्तान आणि उज्बेस्कितान यासारख्या देशांनी बीआरआयला समर्थन दिले आहे. परंतु भारताने पाकव्याप्त काश्मीरमधून जाणाऱया कुठल्याही प्रकल्पाला विरोध दर्शविला आहे. चीनने भारतासमोर या प्रकल्पात सामील होण्याचा प्रस्ताव मांडला होता, परंतु भारताने तो वारंवार फेटाळला आहे.
पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा भूभाग आहे. 2013 मध्ये सीपीईसी प्रकल्पाच्या कामाची सुरुवात करण्यात आली होती. या प्रकल्पाद्वारे पाकिस्तानच्या ग्वादार बंदराला चीनच्या शिनजियांग प्रांताशी जोडण्याची योजना आहे. चीनने या प्रकल्पाकरता मोठी गुंतवणूक केली असली तरीही त्याचा वेग सध्या मंदावला आहे. या प्रकल्पाला बलुचिस्तानातील स्थानिक समुदायाचा विरोध आहे.









