स्पेस हा शब्द ज्या अंतराळासाठी वापरला जातो ते अवकाश पृथ्वीपासून हजारो मैल दूर आहे. त्यातल्या प्रत्येक ग्रहताऱ्यांच्यामध्ये प्रचंड अंतर आहेच. फक्त त्यांच्या परिवलनात ते एकमेकांसमोर आले की एकमेकांचे घास घेतात की काय? अशी दशा निर्माण होते ज्याला आम्ही ग्रहण असं म्हणतो. ग्रहण हा योग्य शब्द आमच्या पूर्वजांनी नेमका वापरलाय. आमच्या माणसाच्या बाबतीतही असंच काहीसं घडत असतं. जो तो आपापल्या स्पेसमध्ये राहायला लागला की दुसऱ्याचं अतिक्रमण नको वाटतं आणि असं अतिक्रमण झालं की मग वादावादी, भांडण, चिडचिड सुरू होते. ती इतकी विकोपाला जाते की शेवटी एकमेकांचे चेहरे बघणंसुद्धा नको अशा मनस्थितीला आम्ही येतो. पण निसर्गात मात्र ही सगळी पंचमहाभूते गुण्यागोविंदाने नांदताना दिसतात. माणसाच्या वयाप्रमाणे त्याच्या विविध अवस्था येतच असतात. म्हणजे बाल्यावस्थेतून किशोरावस्थेत नेमके कधी आलो हे आम्हाला जसं समजत नाही तसंच. कारण ह्या सर्व अवस्थांमध्ये असलेली स्पेस अति मोठी किंवा अति लहान नसल्याने त्या बदलांची जाणीव नेमकेपणाने लक्षात येत नाही. अगदी रेल्वेचे रूळ जितके सहजपणे कुठलाही आवाज न करता सांधा बदलतात तशा या अवस्थांचं एकमेकांमधून जाणं असतं. त्यानुसार या स्पेस काम करत असतात. तारुण्यातून प्रौढावस्थेत जाताना आपण इतके मोठे कसे काय झालो? असा प्रश्न आम्हाला पडतोच. पण सर्वजण आपापले काम करताना दुसऱ्याची स्पेस जपत काम करत असल्यामुळे ते एकमेकांबद्दल कृतज्ञ असतात. म्हणूनच सगळं काही या निसर्गामध्ये सुरळीत पार पडत असतं. शरीरातल्या रचनेतसुद्धा ही पंच महाभुतं आपापलं काम करून व्यवस्थित आपलं कर्तव्य पार पाडत असतात. वायू, अग्नी, जल, जडतत्व यांनी आपापलं प्रमाण सोडून जास्त किंवा कमी प्रमाणात शरीर व्यापलं तर दुसऱ्या तत्वावर ती अतिक्रमणं झालेली असतात आणि मग शरीरामध्ये बिघाड व्हायला सुरुवात होते, प्रकृती ढासळते. या सगळ्या बाबतीत आकाशासारखं संतुलन महत्त्वाचं असतं. निसर्गातही याच पद्धतीने प्रत्येक ऋतू एकमेकांचा हात न सोडता दुसऱ्याची स्पेस जपत असतात. प्रत्येकजण दुसऱ्यासाठी जागा सोडत असतो. दुसऱ्याच्या आनंदासाठी फुलत असतो. फळत असतो. कोणत्याही गोष्टीची कधी तक्रार करताना दिसत नाही किंवा कोणती गोष्ट मागताना तर मुळीच दिसत नाही. अंगा खांद्यावर खेळणारे, बागडणारे पशुपक्षी प्रेमाने ते जसे जपतात तसेच वेलींच्या प्रेमालासुद्धा बांडगुळ न म्हणता आधार देत राहतात. या वृक्षांकडे पाहिलं की समाजभान कसं असावं याचं एक आदर्श उदाहरण आपल्याला कळतं. आम्ही माणसं मात्र स्वतंत्र स्पेस घेत जगत सुटतो, तिथे जन्म देणाऱ्या आई वडील, नातेवाईक, मित्र-मैत्रिणी, समाजातली माणसं या कशालाही अतिक्रमण समजत असतो आणि स्वत:ची घुसमट वाढवत असतो. अशी घुसमट वाढवण्यापेक्षा असं जगण्यापेक्षा या सगळ्यांनी या सगळ्यांचं आपल्या आयुष्यात असलेलं स्थान म्हणजे स्पेस जर मान्य करत जगलो तर एक सुंदर कोलाज असलेलं आयुष्याचं चित्र तयार होईल.








