भाग : 2
अशी ब्रीदींग स्पेस व्हाट्सअप ग्रुपमुळे आमच्यात फार मोठ्या दऱ्या निर्माण करते आणि एकमेकांच्या स्पेसमध्ये आम्ही लक्ष घालायला लागतो. आम्ही मोबाईलवर किती वेळ काम करतोय, आम्ही कोणाशी बोलतोय, आमचे मेसेज काय, याबद्दल जाणून घ्यायची उत्सुकता प्रत्येकाला असते. तसं बोलूनही दाखवलं जातं परंतु अशी स्पेस कमी झाल्यानंतर किंवा वाढल्यानंतर या ग्रुपमध्ये अबोले निर्माण होतात किंवा अनेक लोक ग्रुप सोडून जातात. अशा प्रकारे सतत लांबून दुसऱ्यावर नियंत्रण ठेवणारी माणसं प्रत्येकाच्या स्पेसमध्ये लुडबुड करत असतात. अशी स्पेस आमच्या घरामध्ये सासू सुनेच्या नात्यांमध्ये जास्त मोठी पडलेली दिसून येते. कारण बाहेरून आलेल्या मुलीला नवीन घरात अॅडजस्ट होताना किती गोष्टींशी जुळवून घ्यायला लागतं, हे ज्या सासूला कळतं ती सासू सुनेच्या प्रत्येक गोष्टीत ढवळाढवळ करत नाही. आजकाल सुनांनीच मात्र त्यांची स्पेस इतकी वेगळी करून घेतली की त्या सासरी आल्यानंतर त्या एका खोलीमध्येच आपला संसार थाटून बसले की काय अशी शंका निर्माण व्हायला लागते आणि अशावेळी सासूचीच कीव करावीशी वाटते. तिने कसंही वागलं तरी समाज त्याचा दोष तिलाच देतो. आमच्या शेजारी सुद्धा आम्ही किती लक्ष घालतोय. आम्ही येणाऱ्या जाणाऱ्यांवर किती लक्ष ठेवतोय यावरून आम्ही आमच्या शेजाऱ्यांची स्पेस कमी करतोय का, याचा विचार प्रत्येकाने करावा. अशा घटनांमुळेच अनेक वितृष्ट किंवा भांडणं व्हायची शक्यता असते. मुलगी आणि वडील यांच्यातील स्पेससुद्धा खूप कमी किंवा नाहीशी झालेली आपल्याला दिसते. वडिलांचा मुलीवरती अतिशय जीव असल्यामुळे मुलीच्या प्रत्येक कृतीच्या मागे वडील बारीक लक्ष ठेवून असतात. अशावेळी मुलीला या गोष्टी आवडत नसल्याने ती तिची स्पेस शोधण्यासाठी बाहेरच्या जगातल्या नात्यांचा आश्रय घ्यायला जाते. म्हणून आम्ही प्रत्येकानीच एकमेकांशी वागताना प्रत्येक गोष्ट मला कळलीच पाहिजे असा अट्टाहास न करता ती गोष्ट हळूहळू सवडीने कळेल इतकी स्पेस आपल्या सगळ्यांच्या नात्यांमध्ये निर्माण व्हायला हवी. आम्ही साधं बोलतानासुद्धा दोन शब्दांमध्ये अंतर राखलं नाही तर ते शब्द एकमेकांवर आदळतात. म्हणजे तिथेही आम्हाला स्पेस देण्याची गरज असते. ती कमी द्यायची किंवा जास्त हे आमच्या बोलण्याच्या पद्धतीवर अवलंबून असते आणि म्हणून दोन शब्दांच्यामध्ये कमी स्पेस दिली तर आमची दमछाक होते आणि जास्त स्पेस दिली तर समोरच्याला ते ऐकावंसं वाटत नाही. शब्दांचे अर्थ बदलतात. त्याच्यामागच्या भावना बदलतात. म्हणून त्याही गोष्टींमध्ये नेमकी स्पेस असायला हवी. आम्ही बोलताना, चालताना, पळताना, खाताना प्रत्येक ठिकाणी एक नेमकी स्पेस ठेवली तरंच आमचं जगणं सुसह्या होणार आहे. खरं तर जन्मल्यानंतर मिळालेला श्वास आणि मृत्यूपर्यंत थांबणारा श्वास याच्यामध्ये नेमकी स्पेस आम्ही ठेवली तर आमचं जगणं सुसह्य होतं. विचारांचंसुद्धा तसंच. आम्ही खूप सगळ्या जगाचा विचार जर आम्ही आमच्या छोट्याशा मेंदूला करायला लावला तर तो मेंदू थकून जाईल. म्हणून कोणत्या गोष्टींचा विचार करायचा आणि कोणत्या नाही, कोणत्या दोन विचारांमध्ये अंतर ठेवायचं हे ज्याला कळलं त्याला जगणं कळलं, असं म्हणतात. आमच्या श्वासाची लय नेमकी केव्हा तुटते ह्याचं निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल आम्हाला छातीचे ठोके जरी सतत ऐकू येत असले तरी मध्येच केव्हातरी उचकी लागते, शिंक येते हे त्याला थांबवण्यासाठी केलेली निसर्गाची एक कृतीच आहे. असं अंतर दिल्यामुळेच आमचं जगणं पुढे सुसह्य व्हायला लागतं. अन्यथा खूप विचारांमुळे किंवा स्पेस न दिल्यामुळे आमच्या मनाची घुसमट वाढते. म्हणूनच आमच्यातला हक्क गाजवण्याचा पझेसिव्हनेस कमी झाला की समजावं, आमच्या वागण्यात दुसऱ्यांच्या प्रती योग्य अंतर म्हणजेच ब्रीदींग स्पेस निर्माण झाली आहे.