प्रतिनिधी,कोल्हापूर
सर्वसामान्य महिला ब्रेस्ट कॅन्सरबाबत अनभिज्ञ आहेत, त्यांच्यासाठी सीपीआर हॉस्पिटलमध्ये ब्रेस्ट कॅन्सर तपासणी आणि समुपदेशन कक्ष सुरू केला आहे. प्रत्येक बुधवारी येथे याची तपासणी होणार आहे. त्यासाठी आवश्यक ती तपासणीची यंत्रणा या कक्षात आहे. याचा लाभ महिलांनी घ्यावा, असे आवाहन राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रदीप दीक्षित यांनी केले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्यावतीने बुधवारी महिला दिनी सीपीआरच्या बाह्यारूग्ण विभागात स्तनांचा कर्करोग आणि जनजागृती उपचार, समुपदेशन कक्ष सुरू केला आहे. त्याच्या उद्घाटनप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संगीता थोरात, वैद्यकीय अधिक्षक डॉ. गिरीश कांबळे, डॉ. प्रिया होंबाळकर, डॉ. कुरूंदवाडे यांची प्रमुख उपस्थित होती.
अधिष्ठाता डॉ. दीक्षित म्हणाले, वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्या सुचनेनुसार स्तनांचा कर्करोग जनजागृती आणि उपचार मोहीम राज्यात सुरू झाली आहे. सीपीआरमध्ये बाह्यारूग्ण विभागात प्रत्येक बुधवारी दुपारी 12 ते 2 या वेळेत ही तपासणी होणार आहे. याची जबाबदारी डॉ. प्रिया होंबाळकर यांच्याकडे आहे. येथे रेडिओथेरपी, स्त्रीरोग, एक्सरे, जन औषधवैद्यकशास्त्र, नर्सिग, भौतिकोपचार कार्यरत असणार आहे. कर्करोगाच्या प्राथमिक तपासणीसाठी मॅमोग्राफी, अन्य उपकरणे असतील, गरज पडल्यास रूग्णांना केमोथेरपी, रेडिओथेरपी दिली जाईल, असे त्यांनी सांगितले.
डॉ. थोरात म्हणाल्या, स्तनांचा कर्करोग असलेल्या रूग्णांसाठी समुपदेशन आणि पुनर्वसन केंद्रही सुरू होणार आहे. भारतात महिलांमधील एकूण 6 लाख 78 हजार 383 कर्करूग्णांत 1 लाख 78 हजार 361 रूग्ण स्तनाच्या कर्करोगाचे होते. हे प्रमाण 27 टक्के आहे. तसेच कर्करोगाने 4 लाख 13 हजार 381 जणांचा मृत्यू होते. यामध्ये 90 हजार 405 मृत्यू हे स्तनांच्या कर्करोगाचे आहेत. पहिल्या टप्प्यात त्याचे निदान झाल्यास तो लवकर बरा होतो. स्तनाच्या कोणत्याही भागात वेदना, गाठ तयार होणे, सुज, जळजळणे, डाग पडणे, स्तनाग्रातून रक्त येणे, लालसर होणे, आकार बदलणे आदी त्याची लक्षणे आहेत. त्यामुळे महिलांनी नियमित तपासणी करून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
डॉ.प्रिया होंबाळकर यांनी स्वागत केले. डॉ.गिरीश कांबळे यांनी आभार मानले. यावेळी डॉ. नमिता प्रभू, डॉ. कुरूंदवाडे, शशिकांत रावळ, रोहित लोखंडे, बाजीराव आपटे,, अशोक वाघुळे, सुनीता जाधव, रोहिणी गांगुर्डे आदी उपस्थित होते.
Previous Articleजागतिक महिला दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन
Next Article नाणोस येथे विविध उपक्रमांनी महिला दिन उत्साहात









