वार्ताहर /माशेल
सुसंग, नारीशक्ती फोंडा आणि युवराज सिंग फांऊडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्तन कर्करोग जागृती शिबिर माशेल येथील देवकीकृष्ण सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. वैद्य माधवीलता दिक्षित यांनी उपस्थित महिलांना स्तन कर्करोगाविषयी माहिती दिली.
चुकीची जीवनशैली, अवेळी होणारे जेवण, दिवसा झोप व रात्री जागरण तसेच चुकीच्या पद्धतीने मांसाहार यामुळे केवळ स्तनाचा कर्करोगच नव्हे अन्य विविध आजार होऊ शकतात. त्यासाठी प्राणायाम, योगा करतानाच समतोल आहार घेण्याचा सल्ला वैद्य दिक्षित यांनी दिला. फास्टफूड, जंकफूडसारखे पदार्थ टाळावेत, असेही त्यांनी सांगितले. माजी मुख्याध्यापिका स्वप्ना धुपकर यांनी दैनंदिन जीवनातील आहार सात्विक असला पाहिजे तसेच ऋतूनुसार फळे, भाज्या खाण्याचा सल्ला दिला. नारीशक्तीच्या अध्यक्ष अनिता कवळेकर यांनी प्रास्ताविक केले. युवराज फांऊडेशनतर्फे सुरु असलेल्या या शिबिरात आत्तापर्यंत 15 हजार महिलांनी सहभाग दर्शविल्याचे त्यांनी सांगितले. सुसंग संस्थेच्या प्रितम भगत यांनी स्वागत केले. युवराज फाऊंडेशनतर्फे डॉ. श्रुती गावकर, डॉ. निकी हडफडकर व डॉ. प्रतिक्षा या उपस्थित होत्या. प्रज्वला शेटकर यांनी आभार मानले.









