जालना जिल्ह्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्य़ा मराठा आंदोलकांवर पोलीसांकडून लाठीचार्ज केल्याची घटना घडली आहे. जालना जिल्ह्यातल्या अंतर्वली गावात ही घटना घडली असून आंदोलकांच्या मांडवात घुसून पोलीसांनी महिला आणि लहान मुलांवर जबर लाठीचार्ज केल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. या घटनेचे पडसाद उमटले असून धुळे- सोलापूर महामार्गावर गांड्याची जाळपोळ केल्याच्या घटना घडल्या आहेत.
जालना जिल्ह्यातील अंतर्वली गावात मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे आपल्या काही सहकाऱ्यांसह उपोषणाला बसले आहेत. २९ ऑगस्टपासून हे उपोषण आंदोलन सुरु असून मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे. प्रशासनाकडून हे उपोषण मागे घेण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांना विनंती केली होती.
पण त्यानंतरही त्यांनी आपले उपोषण सुरु ठेवल्याने त्यांची प्रकृती बिघडली. आंदोलक आपल्या विनंतीला जुमानत नसून परिस्थिती हाताबाहेर जाण्यापुर्वी पोलीस एक्शन मोडवर आली. पोलिसांनी आंदोलकांच्या मांडवात घुसून लाठीचार्ज सुरु केला. या आंदोलनात लहान मुलं, महिलाही होत्या. त्यांच्यावरही लाठीमार झाल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. पोलीसांनी आंदोलकांनी दगडफेक केल्याने आणि गोंधळ घातल्यानेच लाठीचार्ज सुरु केल्याचे सांगितले आहे..








