उत्तरप्रदेशातील वकील उमेश पाल हत्याकांड प्रकरणातील वॉन्टेड गँगस्टर असद अहमद यांचा उत्तर प्रदेश पोलिसांच्या टास्क फोर्सने झाशीमध्ये एन्काउंटर करून ठार केले आहे. गुन्हेगारी विश्वातून नंतर राजकारणात स्थिर झालेल्या अतिक अहमदचा तो मुलगा होता.
असद आणि त्याच्या टोळीतील गुलाम नावाचा आणखी एक सदस्य उमेश पाल या वकिलाच्या हत्येप्रकरणी वाँटेड होते. त्यांच्यावर प्रत्येकी ५ लाखांचे सरकारचे बक्षीस होते. ठार झालेल्या आरोपींकडून विदेशी बनावटीची अत्याधुनिक शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत
गॅंगस्टर अतीक अहमद आणि त्याच्या भावाला उमेश पाल हत्याकांडासंदर्भात प्रयागराज न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्याचवेळी तिकडे असदचा चकमकीत मृत्यू झाला. या गुंडाला न्यायालयात हजर करण्यासाठी अहमदाबादच्या साबरमती कारागृहातून रस्त्याने प्रयागराजला आणण्यात आले होते.
2005 मध्ये झालेल्या बहुजन समाज पक्षाचे (BSP) आमदार राजू पाल यांच्या हत्येचा उमेश पाल हे महत्वाचे साक्षीदार होते. यात अहमद हा आरोपी आहे. त्यानंतर 24 फेब्रुवारी रोजी उमेश पाल आणि त्यांच्या दोन सुरक्षा रक्षकांची प्रयागराज येथील त्यांच्या घराबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. उमेश पाल यांच्या पत्नी जया पाल यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार अहमद, अशरफ, त्यांचे कुटुंबीय आणि इतरांविरुद्ध २५ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.








