हेस्कॉमकडून दुरुस्तीचे काम हाती
बेळगाव : रिसालदार गल्ली येथील ट्रान्स्फॉर्मरमध्ये सोमवारी सायंकाळी बिघाड झाला. अचानक मोठा आवाज होऊन ट्रान्स्फॉर्मरमधून ठिणग्या पडू लागल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. तात्काळ हेस्कॉमच्या कर्मचाऱ्यांनी ट्रान्स्फॉर्मरची दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केला. परंतु दुरुस्तीनंतरही ठिणग्या पडत असल्याने नाराजी व्यक्त होत होती. रिसालदार गल्ली येथील शनिवारखूट शेजारील ट्रान्स्फॉर्मरमध्ये मोठा आवाज होऊन बिघाड झाला. मुख्य मार्गावरच ट्रान्स्फॉर्मरमधून आगीच्या ठिणग्या पडत असल्याने एकच गोंधळ उडाला. या ट्रान्स्फॉर्मरखालून नागरिकांची ये-जा असते. एखाद्या व्यक्तीच्या अंगावर या ठिणग्या पडल्या असत्या तर मोठा अनर्थ घडला असता. स्थानिक नागरिकांनी हेस्कॉमच्या कर्मचाऱ्यांना याची माहिती दिली. हेस्कॉमच्या कर्मचाऱ्यांनी ट्रान्स्फॉर्मरची दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केला. परंतु वारंवार ठिणग्या पडत असल्याने काय करावे हे त्यांनाही समजत नव्हते. यामुळे परिसरात मात्र बराच वेळ अंधार होता.









