कणकवली शहरातील घटना ; युवतीची पोलीस ठाण्यात धाव
कणकवली : वार्ताहर
‘ब्रेकअप’च्या वादातून युवकाने चक्क युवतीच्या अंगावर पेट्रोल टाकण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर युवकाने येथील गणपतीसाना गाठून थेट नदीत उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. शनिवारी सकाळी १० वा. सुमारास येथे घडलेल्या या प्रकारानंतर एकच खळबळ उडाली होती. दरम्यान सदरच्या युवतीने पोलीस ठाणेही गाठले असून याबाबत तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सदर युवक युवतीमध्ये प्रेमसंबंध होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून युवतीने युवकाला टाळायचे सुरु केले व युवकाचा नंबरही ‘ब्लॉक’ केला. याच रागाने युवकाने थेट युवतीचे घर गाठले. तेथे युवकाने युवतीच्या अंगावर पेट्रोल टाकण्याचा प्रयत्न करत काहीवेळ धिंगाणा घातला. मात्र, परिसरातील काहींनी हुसकावल्याने वैफल्यग्रस्त झालेल्या युवकाने थेट येथील गणपतीसाना गाठला व नदीपात्रात उडी घेतली. नजीकच्या कपडे धुणाऱ्या बायकांनी आरडाओरड केल्याने परिसरातील काहींनी धाव घेऊन युवकाला पाण्याबाहेर काढले. घटनेची माहिती समजताच पोलीसही तेथे दाखल झाले होते.









