सेन्सेक्स 326 अंकांनी वधारला ः बँकिंग समभाग तेजीत
वृत्तसंस्था/ मुंबई
सकाळी नकारात्मक सुरूवात करणाऱया भारतीय शेअर बाजाराने दिवसभरात सावरत अखेर तेजीसह बंद होण्यात सोमवारी यश मिळवलं आहे. सलगच्या तीन सत्रात घसरणीला अखेर सोमवारी विराम मिळाल्याने गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला हे मात्र नक्की.
सोमवारी सरतेशेवटी आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 326 अंकांच्या वाढीसह 53,234.77 अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 83 अंकांच्या तेजीसह 15,835.40 अंकांवर बंद झाला होता. मिळत्या जुळत्या जागतिक संकेताच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजारात विक्री दिसून आली. सोमवारी आशियाई बाजारात मिळताजुळता कल होता. शुक्रवारी अमेरिकेतील बाजारात खरेदीचा जोर होता. आयटी आणि धातू समभागांमध्ये विक्री दिसली. निफ्टी धातू निर्देशांक 1.5 टक्के इतका कमकुवत तर आयटी निर्देशांकही अर्धा टक्का घसरणीत होता. तर ऑटो निर्देशांकही कमकुवत दिसून आला होता. बँक आणि वित्त कंपन्यांचा निर्देशांक मात्र तेजीसह कार्यरत होता. फार्मा, रियॅल्टी आणि एफएमसीजी निर्देशांकांनीही तेजीसह बाजाराला आधार दिला होता. दुपारी 30 समभागांचा सेन्सेक्स 150 अंकांच्या तेजीसह 52,759 अंकांवर तर निफ्टी निर्देशांक 37 अंकांच्या वाढीसह 15,715 अंकांवर कार्यरत होता. टाटा स्टील, महिंद्रा आणि महिंद्रा, टीसीएस, विप्रो, डॉ. रेड्डिज लॅब्ज आणि एचडीएफसी यांचे समभाग घसरणीत होते. एनएमडीसी, जेएसडब्ल्यू स्टील, हिंडाल्को, सेल यांचे समभाग 3 टक्क्यापर्यंत घसरलेले दिसले. दुसरीकडे रुपयाही सोमवारी सुरूवातीच्या सत्रात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत घसरणीसह 79.03 वर कार्यरत होता. शुक्रवारी विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी शुद्ध स्वरूपात 2,324.74 कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केली आहे. बँकिंग क्षेत्रातील समभागांमध्ये आयसीआयसीआय बँक व इंडसइंड बँक यांचे समभाग तेजीत होते. शेअर बाजाराने एचडीएफसी व एचडीएफसी बँकेच्या एकत्रिकरणाला हिरवा कंदील दाखवला आहे. पण रिझर्व्ह बँकेसह इतरांची परवानगी अद्याप मिळणे बाकी आहे.
जागतिक बाजारांचा कल पाहता अमेरिकेतील बाजार बंद होते. युरोपातील बाजारात तेजी होती तर आशियाई बाजारात निक्की 218 अंकांसह तेजीत होता तर हँगसेंग, कोस्पी व शांघाई कम्पोझीट मात्र घसरणीत राहिले होते.









