वाहतूकमंत्री मॉविन गुदिन्हो यांची माहिती
प्रतिनिधी / पणजी
राज्यातील रेंट अ बाईक व कार यांच्या अतिरेकी संख्येमुळे वाढलेला अविवेकीपणा, बेशिस्ती आणि अपघातांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन पुढील काही काळासाठी अशा वाहनांना परवाने न देण्याचा विचार सरकारने चालविला आहे.
बुधवारी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीतही हा विषय चर्चेस आला होता. त्यातून यापुढे अशा वाहनांसाठी परवाने स्थगित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
2022 च्या नवीन आर्थिक सर्वेक्षण अहवालानुसार राज्यात अंदाजे 16 लाख लोकसंख्येसाठी सुमारे 15.27 लाख नोंदणीकृत वाहने आहेत. त्यात कार आणि जीप आदी चारचाकींचा वाटा 22 टक्के, तर दुचाकींचे प्रमाण 70.81 टक्के एवढे असल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्यात पर्यटन व्यवसाय पुन्हा तेजीत आल्यामुळे रेंट अ बाईक व्यवसायाला सुगीचे दिवस आले आहेत. जो तो उठतो आणि या दुचाकी खरेदी करतो. एखाद्या बेकारापेक्षा नोकरी पेशातील लोकांनीच ’पार्ट टाईम बिझनेस’ म्हणून या व्यवसायात मोठी गुंतवणूक केली आहे. आश्चर्यकारक प्रकार म्हणजे कित्येक सरकारी अधिकारी आणि कर्मचारीही या व्यवसायात उतरले आहेत. यातील काही जणांकडे तर कित्येक डझन दुचाक्या आहेत. अशाप्रकारे या दुचाकींना ग्राहकांची मिळणारी पसंती आणि वाढती मागणी पाहता राजधानीतील जवळजवळ प्रत्येक लॉजमालकही या व्यवसायात उतरले आहेत.
अनेक ठिकाणी चालते माफिया राज
या व्यवसायाच्या वाढत्या विस्तारामुळे राजधानीच्या बसस्थानक परिसराचा अर्धाअधिक भाग व्यापून गेला आहे. त्याशिवाय अनेक हॉटेलच्या परिसरातही कित्येक दुचाकी पार्क करून ठेवल्याचे दिसून येते. परिणामस्वरूप राजधानीत अनेक ठिकाणी सर्वसामान्य लोकांना पार्किंगसाठी जागाच शिल्लक नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. काही ठिकाणी तर ’माफिया राज’ सारखेही चित्र असल्याच्या लोकांच्या तक्रारी आहेत. तेथे दुचाकी पार्क करण्यास त्यांच्याकडून अडवणूक तर होतेच शिवाय गाडय़ा मोडून टाकण्याच्या धमक्याही दिल्या जात असल्याच्या तक्रारी ऐकायला येतात.
यासंबंधी सरकारच्या विविध खात्यांकडे अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या. मात्र अद्याप त्यावर कोणतीही कारवाई झालेली नव्हती. उलटपक्षी नवनवीन दुचाकींना परवाने देणे अखंडितपणे सुरू होते.
रेंट अ बाईकचा अतिरेक धोकादायक
या व्यवसायाची दुसरी बाजू तर अत्यंत भयानक आहे. अशा भाडोत्री दुचाकी वापरणारे पर्यटक नंतर कानात वारे गेल्यागत उधळतात. गोवा म्हणजे ’वाहतूक कायदे नसलेले राज्य’, येथे सर्व काही आलबेल असल्याच्या थाटात ते दुचाकी चालवतात. रस्ते माहित नसल्यामुळे मागे बसलेली व्यक्ती जीपीएस वापरून चालकाला मार्गदर्शन करते. काहीजण या दुचाकी प्रशिक्षणासाठीही वापरू लागले आहेत. त्यातून राज्यात अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले असून आतापर्यंत कित्येक पर्यटकांचे मृत्यूही झाले आहेत. या अतिरेकामुळे स्थानिक हैराण होत आहेत आणि संबंधित सरकारी अधिकारी मात्र त्या प्रकारांकडे कानाडोळा करत आहेत.
ही अत्यंत खेदजनक बाब असून त्यातून राज्याविषयी वाईट चित्र सर्वत्र पसरत आहे. या सर्वांवर उपाय म्हणून आता पुढील काही काळासाठी दुचाकींच्या नोंदणीवर मर्यादा घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती प्राप्त झाली आहे.









