कोल्हापूर / इम्रान गवंडी :
फुलेवाडी रिंगरोड, निचितेनगर येथील मनपा रावबहादूर विचारे विद्यालयाच्या नवीन इमारतीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मंजूर झालेला निधी कमी पडल्याने इमारतीच्या उरर्वरित कामाला ब्रेक लागला आहे. नवीन इमारतीचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे. केवळ फरशी, गीलावा अशी किरकोळ कामे शिल्लक राहीली आहेत. निधी कमी पडल्याने गेल्या दोन महिन्यापासून बांधकाम थांबले आहे.
विचारे विद्यालयाच्या नवीन इमारतीचे काम सुरू होऊन एक वर्षाचा कालावधी लोटत आला आहे. दोन मजली बांधकाम पूर्ण झाले आहे. मात्र, अद्यापही दारे, खिडक्या, गिलावा, फरशी आदी किरकोळ कामे शिल्लक राहीले आहेत. महापालिका प्रशासनाने उरर्वरित कामासाठी तत्काळ निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी होत आहे.
फुलेवाडी रिंगरोडसह निचितेनगर, आहिल्याबाई होळकर नगर, क्रांतीसिंह नाना पाटील नगर, कणेरकरनगर, धनगरवाडा, बोंद्रनगर आदी परिसरातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी या शाळेचा मोठा आधार आहे. प्रशासनाने याचा विचार करून तत्काळ निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी होत आहे. काम अपूर्णच राहील्याने विद्यार्थी, पालक व नागरिकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.
- लवकरच नवीन वास्तूत प्रवेश व्हावा
लोकप्रतिनिधी, पालक, शिक्षक व नागरिकांनी वारंवार मागणी केल्याने गतवर्षी इमारतीला निधी मिळाला व प्रत्यक्ष कामालाही सुरूवात झाली. बांधकाम प्रगतीपथावर असले तरी किरकोळ कामासाठी नवीन वास्तूत प्रवेश करण्यास विद्यार्थी व पालकांना वाट पहावी लागू नये.
- गुणवत्तेमुळे पटसंख्येत वाढ
शिक्षणाची गुणवत्ता चांगली असल्यामुळे पटसंख्या वाढत आहे. पालक व विद्यार्थ्यांचा शाळेकडे अधिक कल आहे. त्यामुळे नवीन इमारतीचे बांधकाम वेळेत पूर्ण होणे अपेक्षित आहे.
- पुढील वर्षाचे 50 प्रवेश निश्चित
शाळेचे पहिली ते पाचवीचे सर्व वर्ग इंग्रजी माध्यमाचे आहेत. शाळेचे विद्यार्थी दरवर्षी शिष्यवृत्ती परिक्षेत राज्य व जिल्हास्तरावर चमकतात. स्पर्धा परिक्षांसह क्रीडा, सांस्कृतिक, सार्वजनिक कार्यक्रमात विशेष प्राविण्य मिळवतात. शाळेची गुणवत्ता पाहूण पुढील शैक्षणिक वर्षासाठी पालकांनी आताच नवीन 50 विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित केला आहे.
- उरर्वरित काम लवकरच पूर्ण करू
निधीच्या कमतरतेमुळे काम थांबले आहे. वाढीव कामाचे अंदाजपत्र तयार करून प्रशासकीय पातळीवर निधी मंजूर करण्याची प्रक्रीया सुरू आहे. निधी मंजूर होताच उरर्वरित काम पूर्ण करण्यात येतील. येत्या शैक्षणिक वर्षात नवीन इमारतीमध्ये वर्ग सुरू होतील यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
महादेव फुलारी, उप–शहर अभियंता, मनपा
शाळेची एकूण पटसंख्या : 252
एकूण मुली : 151
एकूण मुले : 101
नवीन प्रवेश : 50
वर्ग : पहिली ते पाचवी
माध्यम : सेमी इंग्लिश








