आरटीओ कार्यालयात वाहनचालकांच्या फेऱ्या : स्मार्टकार्ड नसल्याने विलंब
बेळगाव : वाहनमालकांना नेंदणी प्रमाणपत्र (आरसी), वाहन परवाना (डीएल), कार्ड मिळविण्यासाठी आरटीओ कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत. आरसी व डीएल कार्ड उपलब्ध नसल्यामुळे वाहनचालकांना काही दिवस थांबण्याची सूचना केली जात आहे. अनेक दिवस उलटले तरी कार्ड मिळत नसल्याने वाहनचालक हैराण झाले आहेत. पूर्वी वाहन परवाण्याचे पुस्तक दिले जात होते. परंतु काही वर्षापासून स्मार्टकार्ड दिले जात आहे. रोजमर्ट टेक्नॉलॉजी कंपनीला स्मार्टकार्ड पुरविण्याचे कंत्राट देण्यात आले होते.
त्यांचा कार्यकाळ फेब्रुवारी 2024 मध्ये संपला. नव्याने निविदा काढण्यात आल्या आहेत. या प्रक्रियेबाबत एक कंपनी न्यायालयात गेल्याने स्मार्टकार्डचे वितरण थांबविण्यात आले आहे. बेळगाव आरटीओ विभागामध्ये वाहन परवाना व वाहन नोंदणीसाठी दररोज शेकडो अर्ज येतात. कागदपत्रांची संपूर्ण पडताळणी होऊनदेखील वाहन चालकांना स्मार्टकार्डसाठी थांबावे लागत आहे. अनेक दिवस उलटले तरी स्मार्टकार्ड मिळत नसल्याने नागरिक कार्यालयात येऊन पुन्हा माघारी फिरत आहेत. परिवहन मंत्री रामलिंगा रेड्डी यांनी सर्व आरटीओ विभागांना 13 फेब्रुवारीपर्यंत स्मार्टकार्डचे वितरण सुरू करण्याची सूचना केली आहे.
सर्व्हर डाऊनमुळे कामकाज रखडले
प्रादेशिक परिवहन विभागाचे सर्व कामकाज सध्या ऑनलाईन असल्याने सर्व्हरविना कोणतेच काम होत नाही. परंतु मागील काही दिवसात सर्व्हर डाऊन असल्यामुळे कामकाज रखडत आहे. लर्निंग लायसन्स, ड्रायव्हिंग लायसन्स, आरसी, स्मार्टकार्ड, वाहनाचे नूतनीकरण यासह इतर कामे सर्व्हर डाऊनमुळे रखडत आहेत.









