सेन्सेक्स 715 अंकांनी तेजीत : बँकिंग समभाग तेजीत
मुंबई:
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समिती बैठकीत रेपो दर जैसे थे ठेवण्याच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर बँकिंग समभाग बुधवारी तेजीत होते. बुधवारी भारतीय शेअरबाजाराने 700 हून अधिक अंकांची तेजी राखली आणि निफ्टीही 225 अंकांसह तेजीसोबत बंद झाला.
गेले आठ दिवस भारतीय शेअरबाजार घसरणीत राहिला होता. रिझर्व्ह बँकेच्या निर्णयानंतर आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, कोटक बँक आणि अॅक्सिस बँक यांचे समभाग तेजीत राहिले होते. बुधवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 715 अंकांच्या मजबुतीसोबत 80983 अंकांवर बंद झाला तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 225 अंकांच्या मजबुतीसोबत 24836 अंकांवर बंद झाला. सकाळी सेन्सेक्स 80173 अंकांवर तर निफ्टी 24620 अंकांवर खुला झाला होता. रिझर्व्हच्या निर्णयाआधी बाजारात चढ-उतार दिसून आला. मात्र जसा निर्णय जाहीर झाला त्यानंतर मात्र बाजारात बँकिंग समभागांनी जोमदार कामगिरी करत तेजी आणली.
आरबीआयचा निर्णय बाजारातील गुंतवणूकदारांना उचीत वाटला आणि त्यांनी खरेदीवर जोर दिल्याचे दिसले. भारताचा जीडीपी दर 6.5 ऐवजी 6.8 टक्के राहणार असल्याचे मतही बाजारात गुंतवणूकादारांमध्ये आत्मविश्वास पेरण्यात पुरेसे ठरले. दुसरीकडे ऑटो क्षेत्रातील विविध कंपन्यांचे सप्टेंबर वाहन विक्रीचे आकडे चांगले दिसून आल्याने याचा फायदा बाजाराला झाला.
बाजारात तेजीची कारणे
- मागच्या 8 सत्रात घसरणीनंतर गुंतवणूकदारांनी खरेदी केली. यामुळे बाजारातली घसरण अखेर थांबली.
2.भारतीय रिझर्व्ह बँकेने दुसऱ्या सलगच्या बैठकीत रेपो दर 5.5 टक्के इतका कायम ठेवल्याने त्याचे बाजाराने स्वागत केले. विशेषत: बँकांच्या समभागांमध्ये खरेदी दिसून आली.
3.बुधवारी फार्मा समभागही तेजीत होते. ज्यामुळे बाजाराला मजबूतता प्राप्त झाली. ट्रम्प यांनी 3 वर्षासाठी टॅरिफ सवलतीची घोषणा केल्याने फार्मा समभाग 8 टक्के इतके वाढले होते.









