सातारा / प्रतिनिधी
शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली…भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली…हे हात माझे सर्वस्व, द्रारिद्रय़ाकडे गहाणच राहिले..कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले या नारायण सुर्वे यांच्या कवितेतल्या ओळीप्रमाणे आजच्या जमान्यात भाकरीची किमंत शाळेतील विद्यार्थ्यांना कळायला हवी ही संकल्पना पुढे आली अन् सातारा नगरपालिकेच्या शाळा नंबर 6 मध्ये चक्क भाकरी बनवण्याच्या स्पर्धा शनिवारी आयोजित केल्या. विद्यार्थ्यांनीही मग हिररीने यामध्ये सहभाग नोंदवत चुली मांडल्या, भाकऱ्या थापल्या, लहानग्या हातांनी जाळ लावला. या अनोख्या स्पर्धेची चर्चा चांगलीच सातारा शहरात सुरु होती.
हल्लीचा स्मार्ट फोनचा जमाना, शहरातल्या झोपडपट्टीतही चुल शोधून कुठेतरी एखादी दुसरी सापडेल, चुलीवर भाकरीऐवजी चपातीच आढळून येईल. त्यात चपाती बनवणे तसे सोपे पण भाकरी बनवणे अवघड. आणि भाकरी बनवण्यापेक्षा त्या भाकरीसाठी किती कष्ट सोसवे लागतात किती घाम गाळावा लागतो हे शहरातल्यांना कसे कळणार. शहरात हॉटेलात, ढाब्यावर ऑडर्र सोडली की लगेच भाकरी वेटर आणून देतो. गरम गरम अशी भाकरी. पण तिच भाकरी मिळवण्यासाठी शेतात ज्वारी पेरावी लागते. पेरलेल्या ज्वारीला खुरपणी, कोळपणी करावी लागते. पोटऱ्यात आल्यावर ज्वारीची कणसे भरल्यावर पाखरांपासून राखावी लागते. कापणी करावी लागते. कापणी करुन वाळवून घरात डोक्यावर ओझी घेवून आणावी लागते. घरात ज्वारी निवडून दळण जात्यावर दळावे लागते. दळून पुन्हा ते पिठ भाकरी बनवताना चांगले मळावे लागते. ते मळताना आधार द्यावे लागते. तव्यावर भाकरी टाकून तव्यात आणि चुलीच्या निखाऱ्यावर भाजावी लागते भाकरी. भाजलेली गरम गमर भाकरीचे रहस्य सातारा नगरपालिकेच्या शाळा नंबर 6 च्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतूनच शिक्षकांनी शनिवारी दाखवून दिले. त्याकरता खास भाकरी बनवण्याची स्पर्धाच आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेची तयारी गेल्या चार दिवसांपासून करण्यात आली आणि शनिवारी सकाळी शालेय मैदानामध्ये चूली मांडून स्पर्धेचे आयोजन करण्यात आले पाचवी ते सातवी चे विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी मोठय़ा संख्येने सहभागी झाले. भाकरी बनविण्यासाठी लागणारे साहित्य व भांडी विद्यार्थ्यांनी घरून आणले. त्याचप्रमाणे शालेय स्तरावरून देखिल विद्यार्थ्यांना साहीत्य पुरवले गेले या स्पर्धेचे वैशिष्टय म्हणजे मुलीप्रमाणे मुलांनीदेखील सहभाग घेतला.









