राज्यसभा सभापतींवर अपमानास्पद टिप्पणीचा आरोप
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
काँग्रेस खासदार जयराम रमेश यांच्या विरोधात भाजप खासदार सुधांशु त्रिवेदी यांनी विशेषाधिकार भंगाची नोटीस दिली आहे. जयराम रमेश यांनी राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्या विरोधात अपमानास्पद टिप्पणी केल्याचा आरोप आहे. भाजप खासदाराच्या नोटीसवर सभापती धनखड यांनी हे प्रकरण राज्यसभेच्या विशेषाधिकार समितीकडे चौकशीसाठी पाठविले आहे. चौकशीत रमेश यांच्यावरील आरोप सिद्ध झाल्यास त्यांच्या विरोधात कारवाई केली जाऊ शकते.
जयराम रमेश यांनी मागील अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान सभापतींनी सत्तारुढ पक्षाचा चीयरलीडर होऊ नये आणि विरोधी पक्षाचे म्हणणे देखील ऐकून घ्यावे असे म्हटले हेते. हे वक्तव्य सभापतींचा अपमान करणारे असल्याचा दावा त्रिवेदी यांनी केला आहे. राज्यसभा सचिवालयाने देखील काँग्रेस खासदाराच्या विरोधात विशेषाधिकार भंगाची नोटीस बजावण्यात आल्याची पुष्टी दिली आहे.
राज्यसभा सभापतींनी राज्यसभेची प्रक्रिया आणि कार्य संचालनाचा नियम 203 अंतर्गत ही नोटीस वर्ग केली आहे. यात जयराम रमेश यांच्यावर वारंवार आणि जाणूनबुजून सभापतींच्या विरोधात अपमानास्पद टिप्पणी करण्याचा आरोप आहे. आता विशेषाधिकार समिती आरोपांची चौकशी करत स्वतःचा अहवाल सादर करणार आहे. भाजपच्या आणखी एका खासदाराने जयराम रमेश यांच्याविरोधात सभापतींचा अपमान केल्याची तक्रार केली होती. परंतु सभापतींनी या तक्रारीवर कुठलीच कारवाई केली नव्हती.









