क्रीडा प्रतिनिधी/ मडगांव
चेन्नईन एफसीने आगामी 2023-24 आयएसएल फुटबॉल मोसमासाठी ब्राझिलीयन मीडफिल्डर राफायल क्रिवेल्लारोला करारबद्ध केले आहे. 34 वर्षीय राफायल गेल्या मोसमात जमशेदपूर एफसीला खेळला होता व त्याने 13 सामन्यांतून दोन गोल केले होते व चार गोल करण्यात अन्य खेळाडूंना असिस्ट केले होते. सुपर कपमध्ये खेळताना त्याने तीन सामन्यांतून दोन गोल केले होते.
चेन्नईन एफसीला 2020-21 मध्ये आयएसएलचे जेतेपद मिळवून देताना त्याने कप्तानपदही भुषविले होते. 2019-20 मध्ये चेन्नईन एफसीला उपविजेतेपद मिळवून देताना राफायलने सात गोल केले व आठ वेळा इतरांना गोल करण्यासाठी असिस्ट केले. आयएसएलमध्ये आतापर्यंत राफायलने 37 सामन्यांतून 8 गोल केले असून 11 असिस्ट केले आहेत. चेन्नईला येण्यापूर्वी राफायल क्रिवेल्लारो ब्राझिल, युरोप व गल्फ देशात फुटबॉल खेळला असून युरोपियन लीगमध्ये तो 2013 मध्ये पोर्तुगालच्या वितोरिया गुईमारीस एससी या संघालाही खेळला आहे.









