अल हिलाल-मुंबई एफसी संघ एकाच गटात : मुंबई एफसीचे होमग्राऊंड असलेल्या बालेवाडीत सामना रंगण्याची शक्यता
वृत्तसंस्था /पुणे
भारतात क्रिकेटची क्रेझ असली तरी जगाचं पहिलं प्रेम फुटबॉल आहे, यात तिळमात्र शंका नाही. यामुळेच पेले, मॅराडोना, रोनाल्डो, मेस्सी, नेमार या स्टार फुटबॉलपटूंची नावं माहीत नसलेला क्रीडाप्रेमी सापडणार नाही. टीव्हीवर दिसणारे हे स्टार प्रत्यक्षात पाहायला मिळणं दुर्मिळच. पण हा दुर्मिळ योग लवकरच जुळून येत आहे. आशियाई चॅम्पियन्स लीगमध्ये गुरुवारी नेमारचा अल हिलाल संघ आणि मुंबई सिटी एफसी या संघांना एकाच डी ग्रुपमध्ये सामील केले गेले आहे. याच पार्श्वभूमीवर नेमार मुंबई सिटीविरुद्धच्या सामन्यासाठी भारतात येणार, असे सांगितले जात आहे. नेमारने अलीकडंच पीएसजी क्लब सोडून अल हिलाल या क्लबशी करार केला आहे. मुंबई सिटी एफसी आणि नेमारचा अल-हिलाल हे एकाच डी गटात असल्याने नेमार हा मुंबई सिटी एफसी विरुद्धचा सामना खेळण्यासाठी भारतात येण्याची शक्यता आहे. मुंबई सिटीचा सामना हा त्यांच्या होम ग्राऊंडवर होणार आहे. मुंबई एफसीचे श्री शिवछत्रपती बालेवाडी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स हे होम ग्राऊंड असल्याने पुणेकरांसह देशवासियांना नेमारला खेळताना पाहण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे. दरम्यान, एशियन चॅम्पियन्स लीगचे ग्रुप स्टेजमधील सामने हे 18 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. मात्र अल-हिलालचा भारतातील सामना कधी होणार आहे हे अजून जाहीर झालेले नाही. सामन्यांचे अंतिम वेळापत्रक हे पुढील महिन्याच्या पहिल्या आठवडाभरात जाहीर होण्याची शक्यता आहे.
मुंबई एफसी, अल-हिलाल एकाच गटात
एएफसी चॅम्पियन्स लीग ही स्पर्धा आशियातील अत्यंत प्रतिष्ठेची स्पर्धा समजली जाते. या स्पर्धेत खेळणाऱ्या संघाचे गट आज क्वालालम्पूरमध्ये जाहीर करण्यात आले. मुंबई सिटी एफसीला ग्रुप डीमध्ये स्थान मिळाले आहे. याच गटात अल हिलाल, इराणचा एफसी नासाझी मझांदरन व उझबेकिस्तानच्या नवबाहोर या क्लबचा समावेश असल्याने यंदा कमालीची चुरस या स्पर्धेत पहायला मिळणार आहे. चॅम्पियन्स लीगसाठीच्या ग्रुपची घोषणा केल्यापासून नेमार सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे. भारतीय चाहत्यांमध्ये पहिल्यांदा नेमार देशात येणार, यामुळे प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे.









