सत्तापालटाचा प्रयत्न केल्याचा दावा : डॉलरवर बहिष्कार टाकण्याचा इशारा
वृत्तसंस्था/ ब्राझिलिया
ब्राझीलचे अध्यक्ष लूला डा सिल्वा यांनी अमेरिकेवर सत्तापालट घडवून आणण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. अमेरिकेसोबत संबंध अत्यंत बिघडले असताना सिल्वा यांनी हा आरोप केला आहे. अमेरिकेने माझ्या सरकारला सत्तेवर येण्यापासून रोखण्यासाठी सत्तापालटाचा कट रचला होता असे त्यांनी म्हटले आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्राझीलमधून होणाऱ्या आयातीवर 50 टक्के शुल्क लादण्याची घोषणा केली आहे. यामुळे दोन्ही देशांदरम्यान व्यापारी संघर्ष चिघळला आहे. ट्रम्प आणि लूला यांचे संबंध आधीपासून खराब राहिले आहेत, कारण ट्रम्प यांनी नेहमीच ब्राझीलचे माजी अध्यक्ष जैर बोल्सोनारो यांचे समर्थन केले आहे. बोल्सोनारो देखील ट्रम्प यांचे कट्टर समर्थक राहिले आहेत. परंतु त्यांच्यावर ब्राझीलमधील निवडणुकीत गैरप्रकार आणि निवडणुकीत पराभूत झाल्यावर देशाच्या संसदेवर कब्जा करण्याच्या प्रयत्नांचा आरोप झाला होता.
अमेरिकेने बोल्सोनारो यांना समर्थन देत सत्तापरिवर्तनाचा प्रयत्न केला होता, याप्रकरणी तपास सुरू असल्याचे लूला यांनी सांगितले आहे. बोल्सोनारो यांनी 2022 च्या निवडणुकीत पराभव होऊनही सत्ता न सोडण्याची योजना आखली होती असा आरोप आहे. बोल्सोनारो आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ब्राझीलच्या सैन्याशी संपर्क साधत सत्तापालटाचा कट रचला होता, याच्या माध्यमातून लूला यांना अध्यक्षपद ग्रहण करण्यापासून रोखण्याचा कट होता असा खुलासा चौकशीतून झाला होता. चौकशीत एक मसुदा डिक्रीही मिळाला असून त्यात निवडणूक निकाल रद्द करणे आणि नव्याने निवडणूक करविण्याचा उल्लेख होता. आता बोल्सोनारो यांच्या विरोधात ब्राझीलमध्ये खटला सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर आता लूला यांनी अमेरिकेचे चलन डॉलरवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन देशवासीयांना केले आहे. अमेरिकन डॉलरवरील निर्भरता जगाने कमी करण्याची वेळ आता आली आहे. एकाच देशाचे चलन पूर्ण जागतिक अर्थव्यवस्थेला नियंत्रित करू शकेल अशा जगात आम्ही राहू शकत नाही असे उद्गार लूला यांनी काढले आहेत. लूला हे दीर्घकाळापासून बहुपक्षीय जागतिक आर्थिक अर्थव्यवस्थेचे पक्षधर राहिले आहेत. तसेच त्यांनी ब्रिक्स देशांमध्ये पर्यायी देयक प्रणालीचा पुरस्कार केला आहे.









