अध्यक्ष लूला यांच्याकडून शुल्क हटविण्याची विनंती
वृत्तसंस्था/ ब्राझिलिया
ब्राझीलचे अध्यक्ष लुईस इनासियो लूला दा सिल्वा यांनी अनेक महिन्यांच्या शत्रुत्वानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून पहिल्यांदाच अधिकृत चर्चा केली आहे. फोनवर झालेल्या चर्चेदरम्यान लूला यांनी ट्रम्प यांना ब्राझीलवर लादण्यात आलेले आयातशुल्क हटविण्याचा आग्रह केला आहे. याचबरोबर दोन्ही नेत्यांनी नजीकच्या भविष्यात परस्परांच्या भेटीची सूचना केली. दोन्ही नेत्यांदरम्यान 30 मिनिटांपर्यंत चर्चा झाली. यादरम्यान लूला यांनी पुढील महिन्यात मलेशिया येथे ट्रम्प यांची भेट होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
लूला यांनी ब्राझीलच्या उत्पादनांवरील आयातशुल्क आणि ब्राझीलच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात लादलेले निर्बंध हटविण्याची विनंती ट्रम्प यांच्याकडे केली. ट्रम्प यांनी ब्राझीलच्या विरोधात 50 टक्के आयातशुलक लादले आहे. अमेरिकेकडुन लादण्यात आलेले हे सर्वाधिक आयातशुल्क आहे. ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर एक पोस्ट करत ब्राझीलच्या अध्यक्षांसोबत सकारात्मक चर्चा झाल्याचे म्हटले आहे.
ब्राझीलवर नाराज ट्रम्प
अलिकडच्या महिन्यांमध्ये अमेरिका आणि ब्राझीलच्या संबंधांमध्ये तणाव वाढला आहे. ब्राझीलमधील उजव्या विचारसरणीचे नेते जेयर बोल्सोनारो यांना शिक्षा सुनावण्यात आल्याने ट्रम्प नाराज आहेत. ट्रम्प यांनी ब्राझीलच्या उत्पादनांवर 50 टक्के आयातशुल्क लादले आहे. याचबरोबर ब्राझीलच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशासमवेत अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांवर निर्बंध लादले आहेत.
चर्चा सकारात्मक
अमेरिकेसोबतच्या संबंधांप्रकरणी आम्ही निश्चितच विजयाच्या स्थितीकडे जाऊ असा मला पूर्ण विश्वास असल्याचे वक्तव्य ब्राझलचे उपाध्यक्ष गेराल्डो अल्कमिन यांनी पेले आहे. गेराल्डो हे ब्राझीलच्या वतीने अमेरिकेचे विदेशमंत्री मार्को रुबियो यांच्यासोबत संबंध रुळावर आणण्यासाठी चर्चा करत आहेत. लूला आणि ट्रम्प यांच्यातील चर्चा अपेक्षेपेक्षा अधिक चांगली राहिली आहे. दोन्ही अध्यक्षांनी परस्परांचे वैयक्तिक संपर्क क्रमांकही घेतले असल्याचे गेराल्डो यांनी सांगितले.









