ब्रँडिंगच्या पार्श्वभूमीवर अनेक गुंतागुंतीचे प्रश्न आणि आव्हानेही निर्माण होत आहेत
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘ब्रँड देवाभाऊ’ म्हणून उभे करण्याचा प्रयत्न गेल्या काही महिन्यांपासून प्रकर्षाने जाणवतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पक्षीय आणि केंद्रस्थ नेत्यांना वगळून केलेली खास परंतु विशेष जाहिरातबाजी, योग्य टायमिंग साधत माध्यमांमधील ठळक उपस्थिती, योजनांची वैयक्तिक ओळख आणि राजकीय संघर्षांमध्ये धाडसी भूमिका या सगळ्यांचा संगम म्हणजेच ‘ब्रँड देवाभाऊ’. मात्र, या ब्रँडिंगच्या पार्श्वभूमीवर अनेक गुंतागुंतीचे प्रश्न आणि आव्हानेही निर्माण होत आहेत.
जाहिरातबाजीची राजकीय गुंतवणूक देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमानिर्मितीसाठी सरकारकडून जाहिरातींचा मोठा पल्ला गाठला जात आहे. शासनाच्या योजनांचे ब्रँडिंग केले जात आहे. त्यांचे ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या जलयुक्त शिवार, मेट्रो प्रकल्प, इन्फ्रास्ट्रक्चर, गुंतवणूक शिखर परिषद अशा योजनांमध्ये ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस’ हे नाव मोठ्या प्रमाणात झळकते.
शक्तिपीठ महामार्गाची आखणी आणि आता बांधणीत अग्रेसर राहून ते पक्षांतर्गत विरोधकांवर मात करु पाहत आहेत. सोशल मीडिया मोहिमा यशस्वीपणे राबवल्या जात आहेत. यंत्रबद्ध पद्धतीने फेसबुक, एक्स, इन्स्टाग्राम आणि युट्यूबवर देवाभाऊंची प्रतिमा ‘निर्णायक, विकासाभिमुख आणि स्थिर नेता’ म्हणून पुढे केली जात आहे.
खासकरुन मराठा आरक्षणाचे आंदोलन आणि मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनाच्या स्थगितीनंतर महाराष्ट्राच्या मनाचा ठाव घेणाऱ्या पोस्ट त्यांच्या टीमकडून व्हायरल केल्या जात आहेत.
► मराठा आंदोलन : प्रतिमेला धक्का फडणवीस सरकारसमोर मराठा आरक्षण हा सर्वात कठीण प्रश्न आहे. मागील दोन वर्षांत जरांगे–पाटलांच्या नेतृत्वाखालील मराठा आंदोलनाने सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. जरांगे पाटील यांच्या टीकेच्या केंद्रस्थानी कायमच देवेंद्र फडणवीस राहिले आहेत. मात्र प्रत्येकवेळी ते यातून सहीसलामत सुटलेच. याशिवाय पुन्हा अधिक ताकदीने पाय रोवून उभे राहिल्याचे प्रकर्षाने पुढे आले.
► महायुतीतील अंतर्गत संघर्ष : महाराष्ट्रातील महायुती सरकारमध्ये फडणवीस हे एक महत्त्वाचे ‘पॉवर सेंटर’ आहेत. मात्र, त्यांची ही ताकद अनेकदा संघर्षाचे कारण ठरते. मुख्यमंत्रीपदामुळे राज्याचा सर्वच विभागांचा प्रत्यक्ष कारभार देवेंद्र फडणवीस चालवतात, असा शिंदे गटाचा आरोप आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास विभागाची झाडाझडती घेऊन फडणवीस यांनी मीच राज्याचा प्रमुख हा इशाराच दिला आहे. भाजप–शिंदे–राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्यातील तणाव आहे. उमेदवारी वाटप, निधी वाटप आणि पदे यावरून तीन गटांमध्ये संघर्ष वाढला आहे. महायुतीत ‘संकटमोचक’ म्हणून ओळख निर्माण करताना फडणवीस यांना ‘हुकूमशाही शैली’चा ठपका बसत आहे.
► स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका; खरी कसोटी
मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, कोल्हापूर अशा मोठ्या महापालिका निवडणुका होणार आहेत. मुंबई महापालिकेची निवडणूक फडणवीस यांच्या ब्रँडिंगची खरी परीक्षा ठरेल. मुंबईत शिंदे–भाजप युतीचा शिवसेना ठाकरे गटाशी थेट सामना आहे. नागपूर हा फडणवीसांचा बालेकिल्ला. येथे विजय मिळवणे ‘ब्रँड देवाभाऊ’ची प्रतिष्ठेची लढाई ठरेल. मुंबई, नागपूरनंतर सर्वाधिक लक्ष पुण्यात दिले आहे. अजित पवार यांना योग्य अंतरावर राखत पुणे आणि पिंपरी महापालिकेत दबदबा कायम राखण्याचे आव्हान आहे.
► ‘ब्रँड देवाभाऊ’चे राजकीय भविष्य देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा ‘कडक
प्रशासक’ आणि ‘विकासाभिमुख नेता’ अशी बांधली जात आहे. मराठा समाजातील कथित असंतोष, महायुतीतील अंतर्गत मतभेद, स्थानिक निवडणुकांतील युती आणि आघाडीबाबतची अनिश्चितता हे घटक त्यांच्या ब्रँडिंगला तडा देणार नाहीत याची दक्षता फडणवीस यांच्या टीमला घ्यावी लागणार आहे. त्यांच्या ‘ब्रँड देवाभाऊ’ या राजकीय ओळखीला टिकवण्यासाठी पुढील निवडणुकांमध्ये निर्णायक विजय आवश्यक आहे.
‘ब्रँड देवाभाऊ’ ही फक्त जाहिरातबाजीची मोहीम नाही; ती महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष, सामाजिक प्रश्न आणि निवडणुकांच्या समीकरणांशी घट्टपणे जोडलेली आहे. यशस्वी झाल्यास फडणवीस यांची राष्ट्रीय पातळीवर भूमिका अधिक मजबूत होईल, पण अपयश आल्यास हा ब्रँड त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील सर्वात मोठा धोका ठरू शकतो.








