कब्जेधारकांच्या बाजूने तहसीलदारांचा निकाल, जैसे थे आदेशही संपुष्टात
प्रतिनिधी / मिरज
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील अमर टॉकीजसमोर असलेल्या वादग्रस्त ख्वॉजा वसाहत जागेसंदर्भात बुधवारी तालुका कार्यकारी दंडाधिकारी तथा तहसीलदार डी. एस. कुंभार यांनी कब्जेधारकांच्या बाजूने निकाल दिला. यामुळे जागेचा कब्जा मिळविण्यासाठी रातोरात पाडापाडी करुन हैदोस घालणाऱ्या ब्रम्हानंद पडळकर यांना दणका बसला आहे. आता सदर जागेवरील जैसे थे परिस्थितीचा आदेशही संपुष्टात आला असून, कब्जेधारकांकडून पुन्हा बांधकाम सुरू करण्यात आले आहे. पडळकर यांनी या निर्णयाविरुध्द पुढील न्यायालयात दाद मागावी, असे आदेशही तहसीलदारांनी दिले आहेत. दरम्यान, पाडापाडी प्रकरणी नुकसान भरपाईसाठी पडळकर यांच्या विरुध्द न्यायालयात दावा दाखल करणार असल्याची माहिती कब्जेधारकांकडून देण्यात आली आहे.
कब्जेधारकांच्या वतीने ऍड. ए. ए. काझी, ऍड. नितीन माने, ऍड. समीर हंगड आणि ऍड. नागेश माळी यांनी काम पाहिले. वर्षानुवर्षे एकाच जागेवर कब्जेधारक व्यवसाय करीत असल्याने त्यांच्याकडे योग्य ती शासकीय कागदपत्रे उपलब्ध होती. कब्जेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या आदेशांचा आधार घेऊन सदर कागदपत्रे तहसीलदारांसमोर सादर करण्यात आली. या कागदोपत्री पुराव्यांवरुन संबंधीत कब्जेधारकांचा कब्जा कायदेशीररित्या योग्य असल्याचा निर्वाळा तहसिलदारांनी आपल्या निकालात दिला आहे.