प्रतिनिधी / खानापूर
सहदेव अर्जुन गावकर वय 26 या ब्रेनडेड झालेल्या युवकाच्या देह दानामुळे चौघांना जीवदान मिळाले आहे. खानापूर तालुक्यातील आमटे येथील सहदेव गावकर हे सोमवारी रात्री जांबोटीहुन आपल्या गावी आमटे येथे जाताना अपघातात जखमी झाले होते .त्यांच्या डोक्याला जबर मार बसला होता. त्यामुळे त्यांना बेळगाव येथील केएलई हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते .मात्र उपचाराचा काहीही उपयोग न होता ते ब्रेनडेड झाले. त्यांच्या अवयव दानातून चार लोकांना जीवदान मिळणार होते. यासाठी बेळगाव केएलईचे डॉक्टर माधव प्रभू, बेळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते व माजी महापौर विजय मोरे ,केएलई हॉस्पिटलचे अभिमन्यू डागा, आमटे येथील माजी ग्रामपंचायत अध्यक्ष लक्ष्मण कसरलेकर यांनी कुटुंबीयांचे समुपदेशन करून देह दानासाठी त्यांचे समुपदेशन करून यानंतर सहदेव यांचे मूत्रपिंडे, यकृत, व इतर अवयव हे हुबळी पर्यंत ग्रीन कॉरिडोर करून पाठवण्यात आले. तिथून बेंगलोरला पाठवण्यात आलेले आहेत. या देहदानामुळे चार जणांना जीवदान मिळाले आहे. बेळगाव केएलई ते एसडीएम हॉस्पिटल धारवाड पर्यंत झिरो ट्रॅफिक करण्यात आला होता. हुबळी येथून बिजीएस हॉस्पिटल बेंगलोर येथे अवयव पाठविण्यात आले. या ठिकाणी गरजवंतांना अवयवाचे प्रत्यारोपण करण्यात येणार आहे. खानापूर तालुक्यातील ही अवयवदानाची पहिलीच घटना आहे .आज दुपारी सर्व सोपस्कार पूर्ण करून शव नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले,आमटे येथे त्यांच्या गावी सहदेव गावकर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.