चन्नम्मा चौकात आंदोलन छेडून जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन : के-सीईटीवेळी ब्राह्मण विद्यार्थ्यांचे जानवे जबरदस्तीने कापल्याने संताप
बेळगाव : के-सीईटी परीक्षेदरम्यान शिमोगा व बिदर जिल्ह्यांमध्ये ब्राह्मण विद्यार्थ्यांचे जानवे जबरदस्तीने कापून काढून घेण्यात आले. या घटनेविरोधात बेळगाव जिल्हा समस्त ब्राह्मण समाज आक्रमक झाला असून सोमवारी चन्नम्मा चौक येथे मानवी साखळी करून आंदोलन करण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला. मागील आठवड्यात इंजिनिअरिंग तसेच पॅरामेडिकल कोर्सेससाठी के-सीईटी परीक्षा घेण्यात आली. परीक्षेवेळी खांद्यावर जानवे घालून गेलेल्या ब्राह्मण विद्यार्थ्यांना बाजूला काढून त्यांचे जानवे कापण्यात आले. हा एक प्रकारचा धार्मिक स्वातंत्र्यावर घाला घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामुळे संतापलेल्या विद्यार्थ्यांनी योग्यप्रकारे परीक्षाही दिली नाही. केवळ ब्राह्मण विद्यार्थ्यांनाच लक्ष्य करण्याचा कर्नाटक परीक्षा मंडळाचा प्रयत्न होता का? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.
सोमवारी बेळगावमधील समस्त ब्राह्मण समाजाच्यावतीने कन्नड साहित्य भवन येथून मोर्चा काढण्यात आला. राणी चन्नम्मा चौक येथे साखळी उपोषण करून सरकारविरोधात निदर्शने करण्यात आली. हातामध्ये जानवे घेऊन ब्राह्मण समाजाने आंदोलन केले. ज्या विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे, त्यांना पुढील प्रवेशात संधी मिळावी, जानवे काढलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी व पुन्हा असे प्रकार घडणार नाहीत याची काळजी घ्यावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. चन्नम्मा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जोरदार घोषणाबाजी करत मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी निवेदन स्वीकारून आपण हे निवेदन राज्य सरकारला पाठवून देऊ, असे आश्वासन ब्राह्मण समाजाला दिले. यावेळी बेळगाव शहर, तसेच परिसरातील ब्राह्मण बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.









